मुंबईचा कायापालट करण्यासाठी कामांना गती द्यावी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला गृहनिर्माण विभागाचा आढावा


मुंबई|
मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांना पूर्ण करून मुंबईचा कायापालट करण्यासाठी यंत्रणांनी कामांची गती वाढवावी तसेच कामकाजात पारदर्शकता आणावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

गृहनिर्माण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी बांद्रा येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी  गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, एमएमआरडीए चे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, बृहन्मुंबईपोलीस आयुक्त विवेक फणसळकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गृहनिर्माण विभागाशी संबंधित शासनाकडे प्रलंबित असलेले विषय तातडीने मार्गी लावण्यात येतील. म्हाडा किंवा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

लोककल्याणासाठी हे शासन कार्यरत असून गृहनिर्माण विभागाचे निर्णय हे कोणत्याही दबावाखाली घेतले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कामकाजात सुसुत्रता आणुन अधिकाधिक पारदर्शकता वाढविण्यावर भर देण्यात यावा असेही ते म्हणाले. पुढील काही काळातच दृष्य स्वरूपातील बदल झाले पाहिजेत यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य शासनातर्फे केले जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई मंडळाने काढलेल्या “सारसंग्रह” या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी झालेल्या सादरीकरणातील प्रमुख मुद्दे

·        समूह विकासाच्या योजना म्हाडा मार्फत राबविणार.

·        बिडीडी चाळीचे काम वेगाने व्हावे यासाठीचा आढावा

·        धोरणात्मक निर्णय घेऊन  लोकांना मोठ्या प्रमाणात सदनिका मिळतील यावर लक्ष केंद्रीत करणार

·        गिरणी कामगारांना घरे देण्यासंदर्भात चर्चा

·        ठरवलेल्या जागांवरचे काम पुर्ण करणे तसेच नव्या बांधकामात गिरणी कामगारांसाठी लॉटरी काढणार.

·        एसआरए च्या बंद पडलेल्या ६८ योजना खासगी विकासकाकडून काढून म्हाडा मार्फत विकसीत करणार.

·        बॅंकांमध्ये किंवा अन्य न्यायिक कारणांनी रखडलेल्या योजनांना पुन्हा सुरू करणार

·        एसआरए योजनांमधील रहिवाश्यांचे थकीत भाडे आणि संभाव्य भाडे देता यावे यासाठीची योजना आणणार.

·        कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात प्रस्ताव सादर करणार

·        धारावी पुनर्विकासासाठी निविदा काढणार

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी