औरंगाबाद| माहिती अधिकार कायद्याचा उद्देश पारदर्शक गतिमान प्रशासन निर्माण करुन सुराज्य नांदेल असा व्यापक अर्थ माहिती अधिकार कायद्याचा असल्याचे मत ॲडव्होकेट राम शेलकर यांनी आज येथे व्यक्त केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास (आस्थापना) विभागाच्या सहायक संचालक कुसूम राठोड यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
सामान्य नागरिकांना माहिती देणे हे जरी आपले अधिकारी म्हणून कर्तव्य असले तरी व्यापक लोकहित असल्याची खात्री पटल्याखेरीज माहिती अधिकाऱ्यांनी संबंधित नागरिकास माहिती देणे बंधनकारक नसलयाचे सांगितले. ॲडव्होकेट शेलकर म्हणाले की, संबंधित अर्जदार हेतूपुरस्सर माहिती मागत असून ती व्यापक स्वरुपाची, त्रास देण्याच्या हेतूने माहिती मागणे, या कामासाठी कार्यालयातील 75 टक्के लेखन सामुग्री वापरली जाणार असल्यास अशा स्वरुपाची माहिती न देणं हे अधिनियमाच्या उद्दिष्टानुसार जनमाहिती अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा.
माहिती देताना सद्सद् विवेक बुध्दी वापरुन संबंधित माहिती द्यावी. त्रास देण्याच्या हेतूने, वारंवार एकाच व्यक्तीने माहिती मागणे, इत्यादी विघातक वृत्तींना आळा बसेल. त्याचबरोबर कुठलाही मंच, संघटना, समुदाय, संस्था आदींच्या लेटरहेडचा वापर करुन माहिती मागितली असल्यास अशा संबंधित व्यक्तींना माहिती नाकारण्याचा संपूर्ण अधिकार माहिती अधिकाऱ्याचा असल्याचे यावेळी ॲडव्होकेट शेलकर यांनी सांगितले. यावेळी माहिती अधिकार कायद्याची पार्श्वभूमी, उद्देश, नियम, कलम आदी संदर्भात उदाहरणादाखल सविस्तर माहिती श्री.शेलकर यांनी दिली.