श्री रेणुकादेवी व माहूरगडाच्या स्वच्छतेसाठी भाविक व नागरिकांचेही योगदान लाखमोलाचे - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर -NNL

▪️श्री शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्णत्वास

▪️संस्थानच्या बैठकीत विविध सेवा-सुविधा व्यवस्थेचा आढावा


नांदेड, अनिल मादसवार|
देवसस्थान परिसरातील स्वच्छता ही कोणत्याही भाविकाला अगोदर भावते. स्वच्छतेतून पावित्र्यता अधिक वृद्धींगत होते हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. स्वच्छता ही कोण्या एका घटकाची, यंत्रणेची जबाबदारी नसून ती प्रत्येकाच्या कर्तव्याचा भाग झाली पाहिजे. भक्त म्हणून, भाविक म्हणून सर्वांचीच ती जबाबदारी असते. ज्या ठिकाणी ही जबाबदारी चोख पार पाडल्या जाते ते मंदिर व परिसर अधिक भावतो, असे प्रतिपादन श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष तथा नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी केले.

श्री रेणुका संस्थान श्रीक्षेत्र माहूरगड येथील श्री शारदीय नवरात्र महोत्सवाची आढावा बैठक आज माहूरगड येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, सहायक जिल्हाधिकारी तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे सचिव किर्तीकिरण एच. पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी तथा संस्थानचे उपाध्यक्ष विजय डोंगरे, तहसिलदार तथा संस्थानचे कोषाध्यक्ष किशोर यादव, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, बालाजी जगत, दुर्गादास भोपी, अरविंद देव आदी मान्यवर उपस्थित होते.


शेगाव येथील गजानन महाराज संस्थान, आपल्या नांदेडचा श्री सचखंड गुरुद्वारा व इतर निवडक मंदिर परिसरात असलेली स्वच्छता ही भाविकांनी संस्थानासमवेत मिळून दिलेल्या योगदानाचे द्योतक आहे. श्री रेणुकादेवी संस्थान याचदृष्टिने विचार करत असून हा नवरात्र महोत्सव हरित नवरात्र उत्सव म्हणून आपण अधिक जबाबदारीने साजरा करू यात. अध्यक्ष म्हणून मला संस्थानची सेवा करण्याची संधी मिळाली आहे या दृष्टिकोणातून मी तत्पर आहे. इश्वराच्या परिसरात सेवेला अधिक महत्व असते. याचबरोबर एक नागरिक म्हणूनही आपले कर्तव्य प्रत्येकाने जर चोख बजावले तर हा परिसरही अधिक आपण सुंदर बनू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथील विकासाच्या प्रक्रियेत काही ठिकाणी भौगोलिक दृष्टिकोणातून येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येतील यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

एक शक्ती पीठ म्हणून अवघा महाराष्ट्र माहूरकडे पाहतो. संस्थानकडून माहूरकरांच्या काही अपेक्षा आहेत हेही मी समजू शकतो. संस्थानच्या व श्री शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने याच परिसरातील नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी व कर्तव्य अधिक चोखपणे पार पाडावीत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले. पोलिसांच्या मदतीसाठी माहूर येथून काही स्वयंसेवक पुढे येत असतील तर दहा स्वयंसेवकांमागे एक पोलीस कर्मचारी आम्ही उपलब्ध करू असे त्यांनी सांगितले. वाहतूक व इतर नियमांचे काटेकोर पालन झाले नाही तर संबंधिताविरुद्ध कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टिने कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थानतर्फे हा श्री शारदीय नवरात्र महोत्सव अधिक मंगलमय वातावरणात पार पडला जावा यादृष्टिने आम्ही नियोजन केले आहे. सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, अन्नदान, प्रसाद व्यवस्था, आरोग्य विभागाच्या टिम, अन्न व औषधी विभागाकडून दक्षता, पिण्याचे स्वच्छ पाणी आदी जबाबदारी संबंधीत विभाग प्रमुखांवर दिल्याची माहिती संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच पुजार यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांनी बैठकीचे संयोजन करून स्थानिक नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्यास संधी देऊ त्यांचे योग्य ते निरसन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी