नांदेड। विध्यार्थी हा केंद्रबिंदू समजून नांदेडच्या व्हिजन अकादमीचे समीर येरुळकर विद्यार्थ्यांवर शिक्षण आणि संस्काराचे रोपण करतात याचा प्रत्यक्ष अनुभव आई वडील म्हणून आम्ही दोघांनीही घेतल्याचे भावविभोर उद्गार नांदेड चे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी काढले. व्हिजन अकादमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या मेरिट ऑफ ऑर्डर या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर श्री गुरूगोविंदसिंघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ यशवंत जोशी, सौ. रामेश्वरी परदेशी, शैक्षणिक समुपदेशक संजय सारडा, व्हिजन अकादमीचे समीर येरुळकर, नितीन पाटील आणि दीपक जगदंबे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना जिल्हाधिकारी परदेशी यांनी आपले स्वानुभव सांगताना कोरोना चे दोन वर्षे आणि त्यापूर्वी चे दोन वर्षे आपल्या यश या मुलाचे किती क्लिष्ट गेले ते सांगून यशने आठवी नंतर सर्वात महत्वाची अशी बारावीचीच परीक्षा दिली. परीक्षा लिहिण्याचा त्याचा कुठलाच सराव नव्हता आणि आम्ही दोघेही अक्षरशः चिंताग्रस्त होतो.
प्रशासकीय अधिकारी म्हणून होत असणाऱ्या बदल्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा आणतील की काय ही भीती कायम होती मात्र सगळीकडे फिरून स्वतः समीर सरांना भेटून आमचा पाल्य आम्ही त्यांच्या हाती सोपवला आणि रिझल्ट समोर आहे. यश ने राज्यस्तरावरून आपली गुणवत्ता सिद्ध केली मात्र त्याच्या या यशात समीर सरांच्या व्हिजन अकादमीचा सिंहाचा वाटा आहे हे सांगताना मला आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली त्याचबरोबर मला डॉ जोशी सरांनी शिकवले, मी त्यांचा विध्यार्थी आहे असे सांगून, त्यांनी शिकविलेल्या अभियांत्रिकीच्या चॅपटरचे माझे कन्सेप्ट आजही तेवढेच स्पष्ट आहेत, हे त्यांचे शिक्षक म्हणून असलेले कौशल्य आहे, तसेच कौशल्य समीर येरुळकर मध्ये जाणवले असे गौरवोद्गार काढले.
यावेळी बोलताना श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ यशवंत जोशी यांनी शिक्षकांनी नेहमी अपग्रेड राहिले पाहिजे, मी अजून ही विद्यार्थ्याप्रमाणे अभियांत्रिकी क्षेत्रात काय नवीन सुरू आहे याबाबत अद्ययावत राहण्याचा प्रयत्न करतो, तोच प्रयत्न समीर येरुळकर यांच्या कडून होत आहे, हाडाचा शिक्षक हा शब्द ते शब्दशः जगत आहेत हे एक शिक्षक म्हणून आपल्याला अभिमानास्पद असून त्यांच्या नोट्स आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून लक्ष्यात येते. एका चांगल्या कार्यक्रमाला आल्याचे समाधान मला यातून मिळाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सौ. परदेशी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीत शिक्षकांबरोबरच पालकांचे ही मोठे योगदान आहे. आपण आई वडील म्हणून आधी मुलांचे मित्र व्हा, त्याला समजून घ्या, त्याला मानसिक दृष्ट्या सदृढ करा मग यशस्वी होणे खूप म्हणजे खूपच सोपे असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी यश परदेशी या बारावी केमिस्ट्री मध्ये राज्यात टॉपर आलेल्या विद्यार्थ्याने आपल्या यशाचे श्रेय समीर येरुळकर याना देतांना छोट्यातल्या छोट्या समस्यांचे निराकरण केल्याचे सांगितले तर. आकांक्षा भुसेवार या टॉपर या विध्यार्थीनीने " काक चेष्टा बको ध्यानं, श्वान निद्रा तथैवच, अल्पहारी गृह त्यागी, विद्यार्थी पंच लक्षणं " हा संस्कृत श्लोक सांगून याप्रमाणे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर यश हमखास असल्याचे सांगून आपल्या यशात व्हिजन चा मोठा वाटा असल्याचे सांगितले.
व्हिजन अकादमीची वाटचाल सांगताना समीर येरुळकर यांनी मागील आठ वर्षातील अकरावी आणि बारावी ची वाटचाल सांगून प्रत्येक विध्यार्थी गुणवंतच आहे फक्त त्याला समजून घ्या, तो वाटेल तेवढी मेहनत करेल फक्त त्याला प्रोत्साहन द्या. आम्ही तेच करतो. त्याची छोट्यातल्या छोटी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो, शेवटी शिक्षक म्हणून आम्हाला त्यात असणारा आनंद शब्दात नाही व्यक्त करता येणार अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रगीताने या सत्कार सोहळ्याची सांगता करण्यात आली.