शिक्षक सेनेच्या सभासदांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने सत्ताधारी संचालकांची उत्तरे देताना झाली दमछाक!
नांदेड| सहकारी पतपेढी शिक्षण विभागाची ९० वी वार्षिक सभा दि. १८ सप्टेंबर रोजी सौभद्र मंगल कार्यालय येथे पार पडली. या सभेत वेळेचे बंधन पाळण्यात आले नसल्यामुळे अनेक सभासदांनी ही सभा अर्ध्यावरच सोडून निघून गेले तर शिक्षक सेनेच्या सभासदांनी आक्रमक होत उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीने सत्ताधारी संचालकांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले.
सहकारी पतपेढी शिक्षण विभाग म. जिल्हा नांदेडच्या सभेच्या द्वितीय सत्रात पतसंस्थेच्या व्यवहार विषयावर चर्चा होत असते. ही सभा सायंकाळी ६ वाजता सुरु झाली. पहिले सत्र दुपारी १ ते ५ चालले. द्वितीय सत्र सायंकाळी ६ वाजता सुरु झाल्यामुळे बाहेर गावाहुन व इतर तालुक्यातून आलेले सभासद वेळ झाल्यामुळे निघून गेले. द्वितीय सत्राला बरेच सभासद हजर राहु शकले नाहीत. एवढ्या उशिरा सभा घेणे योग्य नसल्याचे बोलून अनेक सभासदांनी नाराजी व्यक्त केली.
पतपेढीच्या लेख्याजोख्यावर चर्चा करण्याऐवजी सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम बराच लांबल्याने बरेच बांधव हजर राहु शकले नाहीत. कार्यालय बंद होण्याची घंटा होऊ लागली होती, त्यातच दोनवेळा लाईट घालवण्यात आली, याला काय समजावे? असा प्रश्न उपस्थित सभासदांना पडला. वीजेच्या लपंडावात प्रश्नांची उत्तरे समाधानकारक होऊ शकली नाहीत. यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी सत्ताधारी संचालकांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी १४ लाख रुपये मनपाला कर भरले पण इतर गाळेधारकांनी भरले नाहीत मग संस्थेने का भरले? किती सूट दिली? त्या काळात ३० टक्के सूट होती असे प्रश्न उपस्थितीत केल्याने त्या प्रश्नांची सत्ताधारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.
ऑनलाईन सभेचा १ लाख ४४ हजार कसा खर्च केला यावर जालना येथील एक कंपनीने १ लाख ४० हजाराला टेंडर घेतले होते असे सांगण्यात आले. ऑनलाईन घ्यायला एवढा खर्च येतो का? काहीतरी थातूर मातूर उत्तरे दिली. कार्यालय स्थलांतरावर काय खर्च झाला हे वाचण्यात आले. पतसंस्था थकीत असल्यामुळे पोटकलम क्र. १.३ (६) मयत डिसीपीएस धारक शिक्षक सभासदांच्या वारसास ३ लाख रुपये मदत पतसंस्थेमार्फत द्यावे असा ठराव मागील काळात घेतला होता तो मान्य करुन घेण्यास हे सत्ताधारी असमर्थ ठरले आहेत, थकबाकीचे कारण सांगत होते. ही थकबाकी कशी वाढली सत्ताधारी संचालकांनी काय केले? वसूलीसाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत यांच्या निष्क्रियतेमुळे पतसंस्था थकीत राहीली उलट होणार्या उत्पन्नातून २ लाखांचा एनपीए खात्याला गेला. हे बोनसचे नुकसानच झाले.
संगणक खर्चाचे वेगवेगळे हेडस लावून १ लाख ४४ हजार केले त्याची उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यांच्या व्यवहारात कुठेही काटकसर दिसून आली नाही उलट वारेमाप खर्च केल्याचा आरोप शिक्षक सेनेच्यावतीने करण्यात आला. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, विरभद्र बसापूरे, सचिन रामदिनवार, मुखेड तालुका अध्यक्ष राम जाधव, नायगाव तालुका अध्यक्ष देविदास जमदडे, बालाजी किसवे, मठवाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.