विविध सामाजिक, धार्मिक आणि समाजउपयोगी उपक्रम राबवावे; जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे
हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवाला दि.२६ रोजी घटनस्थापने पासून सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व मंडळांनी शांततेत उत्सव साजरा व्हावा यासाठी विविध सामाजिक, धार्मिक आणि समाजउपयोगी उपक्रम राबवावे. विसर्जन मिरवणूक शांततेत व्हावी यासाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे. न्यायालायाच्या आदेश असल्यामुळे डीजे लावण्यास कोणतीही परवानगी मिळणार नाही. डीजेसाठी व्यर्थ खर्च नं करता गोर गरिबांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करून आदर्श निर्माण करावा. सूचना देऊनही जर कुणी नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवतील त्यांच्यावर कार्यवाही अटळ आहे. त्यामुळे सर्वानी नियमाचं पालन करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी केले.
त्या हिमायतनगर पोलीस ठाण्यात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित झालेल्या तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, महिला मंडळीस मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी मंचावर पोलीस निरीक्षक बी.डी.भूसुनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, नगरपंचायतीचे अधिकारी, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, माजी जी.प.सदस्य समद खान, प्रभाकर मुधोळकर, संजय माने, आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या कि, गणेशउत्सवाच्या वेळी सूचना देऊनही मंडळांनी डीजे वाजविला. आणि विसर्जनाच्या ऐनवेळी गोंधळ केला. असा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही, त्यासाठी सर्वाना हि पूर्वसूचना आहे. कोणीही डीजे लावण्याचा प्रयत्न करू नये, केवळ नाचण्यासाठी डीजे लावून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेणे गरजेचे आहे.
नगरपंचायतीने मिरवणूक रस्त्याच्या शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम थातुर माथूर न करता प्रामाणिकतेने करावे, होत नसले तर आम्हाला सांगा आमचा माही बघू अश्या शब्दात माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी बैठकीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी गुत्तेदारच्या हलगर्जीपणामुळे गणेशोत्सव काळात असे झाले होते हे मान्य करत यापुढे असे होणार नाही, रस्त्यावरील सर्व खड्डे पूर्णतः काळजीपूर्वक बुजविले जातील असे आश्वासन दिले.
नवरात्र उत्सव काळात अंबेचा जागर व्हावा गोंधळासह इतर धार्मिक कार्यक्रमा बरोबरच सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे कार्यक्रम ठेऊन उत्सव शांततेत व आनंदाने साजरा करावा. विसर्जन मिरवणुकीत नियमाचे उल्लंघन होईल असे कृत्य कोणीही करू नये, कारण या उत्सवात आपल्याच माता -भगिनी सामील असतात. आपण जर असे वागलो तर आपलीच इभ्रत वेशीला टांगली जाऊ शकते. त्यामुळे उत्सवाचे पवित्र सर्वानी राखून शांततेत उत्सव साजरा करावा. कोणी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची कदापि गय केली जाणार नाही. अश्या सूचना अर्चना पाटील यांनी बैंठकीस उपस्थित झालेल्यानां दिल्या. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक भुसनूर यांना डीजे आल्याचे लक्षात येताच तात्काळ सर्व डीजे पोलीस ठाण्यात आणून लावावे. आणि सर्वांवर कार्यवाही करावी अश्या सक्त सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक भुसनूर यांना डीजे आल्याचे लक्षात येताच तात्काळ सर्व डीजे पोलीस ठाण्यात आणून लावावे आणि सर्वांवर कार्यवाही करावी अश्या सक्त सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी बैठकीस शंकर पाटील, गजानन चायल, गंगाधर मिराशे, नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, पत्रकार, महिला मंडळी, सर्व पोलीस कर्मचारी व दुर्गा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
डीवायएसपी अर्चना पाटील यांनी महिला मंडळींशी साधला संवाद
नवरात्र उत्सव साजरा करताना कायद्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बांधकारक आहे. उत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी सर्व महिला मंडळींनी घेऊन जास्तीत जास्त महिलांनी या उत्सवात सहभागी व्हावं. उत्सव साजरा करताना रात्रीच्या वेळचे बंधन पाळावे असेही अर्चना पाटील म्हणाल्या. यावेळी महिला मंडळींनी आम्हाला डीजेची आवश्यकता नाही, महिला फक्त दांडिया, गरबा खेळतात दोन वर्षांनी उत्सव साजरा होतो आहे. यात कोणतेही विघ्न येणार नाही याची काळजी घेऊन आम्ही उत्सव साजरा करून असे आश्वासन महिला मंडळींच्या वतीने ज्योतीताई पार्डीकर, सुनंदाताई दासेवार यांनी दिले.
महिलांनी उत्सव काळात आपल्या अंगावर असलेल्या दागिन्यांची काळजी घ्यावी - पोलीस निरीक्षक भूसुनूर
बैठकीच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांनी उपस्थितांना प्रास्ताविक मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, नवरात्र उत्सव मातेची आराधना करण्याचा उत्सव आहे. हा उत्सव शिस्तीत आणि शांततेत साजरे करून पोलिसांना सहकार्य करावे. विशेषतः महिलांनी उत्सव काळात आपल्या अंगावर असलेल्या दागिन्यांची काळजी घ्यावी. तसेच उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी मंडळाने घेणे गरजेचे आहे. कुठेही अडचण आल्यास आमचे पोलीस कर्मचारी सहकार्यासाठी तयार आहेत. मात्र उत्सवाला गालबोट लागू नये असे कृत्य मंडळाकडून होऊ नये याची सर्वानी काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.