नांदेड| अतिवृष्टीचा महाराष्ट्रातील काही भागाला प्रचंड फटका बसला आहे.महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील लाखो पिके मातीमोल झाली आहेत. कित्येकांच्या व्यवसायाची आणि घरांची देखील पडझड झाली आहे. आताच करोनाच्या संकटातून बाहेर आलेले पालक अशा परिस्थिती मध्ये आपल्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरू शकत नाही. केवळ पैशाअभावी एखाद्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहणे हे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात शोभणीय नाही.
या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे गरजेचे आहे. अशी मागणी करत आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या नेतृत्वात असंख्य विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते.मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम, प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम, प्रदेश सचिव गजानन कऱ्हाळे, प्रमोद देशमुख ,जांमरुनकर सर ,सिधुताई देशमुख ,प्रियंका कैवारे ,दिलीप धोंडगे, सुभास रावणगावकर ,जिल्हाध्यक्ष अजिंक्य देशमुख, फैसल सिद्दीकी, प्रसाद पवार आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे म्हणाले की, अतिवृष्टीचा नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे. नांदेड,अर्धापूर, मुदखेड, कंधार, लोहा, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव, धर्माबाद, उमरी, किनवट, भोकर, हदगाव, हिमायतनगर आणि माहूर तालुक्यातील २,९७,४३२ हेक्टरच्या पेक्षा अधिक पिके मातीमोल झाली आहेत.पिके वाहून गेल्याने नांदेडमध्ये पेरणी केल्याचा कुठे मागमूसही दिसत नाही.अशा परिस्थितीत कोणताही शेतकरी आपल्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरू शकत नाही. केवळ पैशाअभावी एखाद्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहणे हे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात शोभणीय नाही. नांदेड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचा विचार करून सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे गरजेचे आहे. सरकारने याबाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा.