नांदेड, अनिल मादसवार| नांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधीकारी आणि विविध उपक्रम राबवून नांदेड जिल्ह्यात नावलौकिक मिळविणारे डॉ.विपीन इटनकर यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. नांदेड शहरात केलेल्या त्यांच्या चांगल्या कंची पावती म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी थेट नागपूरला जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली केली आहे.
नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीम. विमला आर. यांच्या जागी डॉ. विपीन यांची बदली करण्यात आली आहे. सध्याचा कार्यभार विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असे आदेश अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी दिले आहेत. डॉ.विपीन इटणकर यांनी १७ फेब्रुवारी २०२० रोजी नांदेड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता. गुरुवारी १८ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या किल्ल्यात म्हणजेच नागपूर येथे बदली झाली आहे. त्यांनी कोरोणा काळात माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासोबत योग्य नियोजन आखून नांदेड जिह्यात अनेक चांगली कामे केली आहेत.
त्यांचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या समवेत चांगले हितसंबंध असून ते पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणतील तेच करतात असे भाजप पक्षाच्या वतीने उलट सुलट आरोपही झाले होते. पण जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी अशा आरोपांवर लक्ष न देता अगोदर कोरोना काळामध्ये आणि नंतर नांदेडच्या पूर परिस्थितीमध्ये योग्य नियोजन आखून जिल्ह्याला अनेक संकटांतून बाहेर काढल आहे. त्यामुळे नांदेडकरांच्या वतीने व विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील युवा पिढीच्या वतीने त्यांच्यावर विशेष कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. तर एक तरुण तडफदार युवा प्रशासकीय अधिकारी गमावतोय याचं दुःख देखील नांदेड कारांमधून व्यक्त होताना दिसत आहे.