दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य - राज्य शासनाचा निर्णय -NNL


मुंबई|
दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदा व त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती. 

मृत व जखमी गोविंदांसाठी सहाय्य - यानुसार गोविंदा पथकातील खेळाडूचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.

हा आदेश केवळ या वर्षीसाठी (वर्ष 2022) लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

अटी व शर्ती - हे आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी पुढील अटी व शर्ती लागू आहेत - दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे, न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे, गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी, त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे, मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही, गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून 18 वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही, मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तत्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे, मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तत्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे अहवाल देणे आवश्यक आहे.

दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा - महाराष्ट्राची  सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या (गोविंदा) "प्रो गोविंदा" स्पर्धा घेण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून विजेत्यांना शासकीय नोकरी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्य शासनाने दहिहंडी (गोविंदा) या उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करून "प्रो गोविंदा"  स्पर्धा राबवाव्यात, अशी मागणी दहीहंडी उत्सव आयोजकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित केल्या जातील आणि त्याच्या बक्षिसाची रक्कम शासनामार्फत दिली जाईल. त्याचबरोबर  खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. स्पेन व चीन या देशांमध्ये मानवी मनोरे (पिरॅमिड) म्हणून या खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश असून आपल्याकडे असलेल्या कबड्डी, खो-खो, मल्लखांब सारख्या खेळांप्रमाणे दहीहंडीचाही समावेश होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी