(आज दि.०५ ऑगस्ट २०२२रोजी आमचे मित्र प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांचा वाढदिवस. त्या निमित्त त्यांच्या संबंधाने केलेला हा शब्दप्रपंच.)
काही व्यक्ती जन्माला येताना उदंड इच्छाशक्ती अन उत्साह संगतीला घेवुन जन्माला आलेले असतात. सर्वांच्याच नशिबी तोंडात सोन्याचा चमच्या धरून जन्माला येणं नसतं परंतु जिथं जन्म झालाय तो इलाखा आपल्या वर्तन दरवळीनं सुगंधित करणं नक्कीच आपल्या हाती असतं. तो सुगंध स्वकर्तृत्वाच्या बळावर निर्माण करून आमच्या प्रा.डाॅ.रामकृष्ण बदने गुरूजींनी वास्तव्याची ठिकाणं सुगंधित केली आहेत.
अहमदपूर तालुक्यातील देवकरा या छोट्याशा जन्मगावी वाढताना शालेय शिक्षणासोबत वत्सलाबाई व दत्तात्रय बदने या मेहनती व भक्तीपरायण माता-पित्याच्या संस्कार छत्राखाली रामकिशनाची (घरातले नाव)जडणघडण होताना संत भगवानबाबांचा गावावरचा प्रभाव त्यामुळे वारकरी संप्रदायाचे धडे आपसूकच मिळत गेले. मंदिरावरचं पोथी वाचन व किर्तन प्रवचन बाल रामकिशनाला खुणवू लागले. हळूहळू पोथी वाचताना धरलेली चाल व गोड गळा प्रवचनाकडे घेवून जाणारंच ना ! किर्तनात अभंगा-भजनाचा टाळ वाजविता वाजविता कंबर बांधून किर्तनाचा ताल धरला गेला. वाचक-सूचक, प्रचनकार ते किर्तनकार अशी वारकर्यात ओळख निर्माण झाली.
देवकरा ते नांदेड स्वा.रा.ती.म. विद्यापीठ (व्हाया किनगाव,अहमदपूर, परभणी,लातूर ) असा शिक्षणाचा प्रवास करताना महान साहित्यिक नागार्जूनांच्या कथेतील लोकवादाचा अभ्यास करीत 'विद्यावाचस्पती' ह्या पदवीवर नाममुद्रा कोरली गेली. ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर - विद्यानिकेतन कमळेवाडी-ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर असा सेवेचा प्रवास करताना प्राध्यापक -प्राचार्य-प्रोफेसर अशी पदमुद्रा ठळक होत गेली आहे. सध्या ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथे हिंदी विभागात ते कार्यरत आहेत.
दैवशालाताईंच्या प्रेमळ सान्निध्यात रामकृष्णांच्या संसाराचं पानं अधिकच खुलत गेलं. रेणुका, आकांक्षा,ज्ञानराज ही संसार वेलीला लगडलेली देखणी फळं सांसारिक सफलतेची साक्ष देणारी. वाडी-वस्ती ते शहरवस्तीत विविध माध्यमातून समाजप्रबोधन करणारे बदने सरांना आम्ही आमच्यापासून कसे दूर राहू देणार? बहिःशाल व्याख्यान मालेच्या माध्यमातून सावरगावला नेल्यानंतर मैत्रभाव अधिकच दृढ होत गेला. प्रवचनांच्या माध्यमातून ते सावरगावकरांना अधिक परिचित झालेत.प्रवचनकार बदने साहेबासारखाच हवा.ही भाविकांची सदैव मागणी असते.
२०१० साली मायबोली मराठी परिषदेच्या स्थापनेपासून कार्य करताना २०१६ मध्ये त्यांच्याकडे मायबोलीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली गेली.यथाशक्य प्रामाणिकपणे मायबोलीसाठी ते योगदान देत राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात मायबोली परिवारानं तीन पुस्तकं (कवितासंग्रह ) साहित्य दरबारी रुजू केले आहेत.बदने सरांच्या आईच्या जागरानं महाराष्ट्र पिंजून काढलाय.ग्रामीण महाविद्यालय वसंतनगरला डाॅ.रामकृष्ण बदने सर असलेलं महाविद्यालय का ? ही ओळख कार्यातून देण्यात ते यशस्वी झाले आहेत. विविध समित्या ते मंडळे !व्याख्यानमाला व सामाजिक संघटनांशी ते संलग्न आहेत. सरांच्या कार्याने गावपातळीपासून ते राज्यस्तरापर्यंत विविध पुरस्कारांवर नाममुद्रा कोरलीय.
यात म.फुले शिक्षक परिषदेचा 'राज्यस्तरीय शिक्षक रत्न' म.कबीर समता परिषदेचा महाराष्ट्र भूषण, वनिता महिला बहुउद्देशीय संस्थेचा 'मराठवाडा भूषण', वंजारी युवा संघटना परभणीचा 'मराठवाडा भूषण', स्वारातीम विद्यापीठ नांदेडचा 'उत्कृष्ट शिक्षक' (ग्रामीण) हे पुरस्कार प्रामुख्याने अधोरेखित करावे लागतील. डाॅ.रामकृष्ण बदने सर आज (५ आगस्ट ) पंचावन्नाव्या सालात प्रवेश करीत आहेत. सरांना निखळ निरामय व आरोग्यपूर्ण जीवनासाठी मनस्वी सदिच्छा.
....श्री एकनाथ डुमणे, जेष्ठ साहित्यीक, मुखेड जि.नांदेड, 9096714317