नांदेड| सतत सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषद जिल्हा व शहर शाखेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात तीन ते चार वेळेला मुसळधार पाऊस झाला आहे. तर सातत्याने गेल्या वीस दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या अतिवृष्टीमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरीकांचे जनजीवन संपुर्णतः विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतकर्यांनी पेरलेले पीक पिवळे पडून करपले आहे. 2019 च्या शासन निर्णयानुसार सांगलीच्या धरतीवर शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने अदा करावी. पिकांचे नुकसान झाले असल्याने दुबार पेरणीसाठी 15 ऑगस्ट पूर्वी खावटी कर्ज उपलब्ध करुन द्यावे. ज्या ठिकाणी रस्ते, पुल वाहून गेले आहेत.
त्या ठिकाणी तातडीने रस्ते व पुलाचे काम हाती घेवून दळणवळणाची साधने युद्ध पातळीवर सोय करावी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचण लक्षात घेता वीज बिलात झालेली दरवाढ रद्द करावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.या निवेदनावर मजविपचे केंद्रीय अध्यक्ष माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे, जिल्हाध्यक्ष इंजि. द. मा. रेड्डी, शहराध्यक्ष ऍड. कॉ. प्रदीप नागापूरकर, प्रो. डॉ. लक्ष्मण शिंदे, कॉ.के. के. जांबकर, ऍड.धोंडीबा पवार, चंद्रशेखर अय्यर, सूर्यकांत वाणी, डॉ.पुष्पा कोकिळ, प्रा.के.एस.धुतमल, संभाजीराव शिंदे, कॉ.गणेश शिंदे, दत्ता तुम्मवाड आदींच्या स्वाक्षर्या आहेत.