२१ दिवसात शिवपुराण, भागवत व संगीत रामायण कथेचे आयोजन
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान वाढोणा (हिमायतनगर) च्या वतीने पवित्र श्रावण मासानिमित्त आगामी २१ दिवसाच्या कालावधीत भागवत कथा, संगीत रामायण कथा आणि शिवपुराण कथा असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोणा येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासात विविध कार्यक्रमाचे आयोजन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. याची सुरुवात संगीतमय भागवत कथेने दि.०२ ऑगस्ट मंगळवार पासून होणार आहे. हभप महेशजी महाराज आळंदीकर यांच्या मधुर वाणीत भगवान श्री कृष्णाच्या लीला झाकीतून साकारन्यात येणार आहेत. या कथेचा समारोप दि.०९ ऑगस्ट रोजी भव्य महाप्रसाद वितरणाने केला जाणार आहेत. त्यानंतर दि.१० ऑगस्ट पासून भव्य संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले असून, श्रीराम कथेतून भागवत व रामायणाचार्य हभप. सोनाली दीदी महाजन आळंदीकर यांच्या मधुर वाणीतून उपस्थित भक्तांना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या कार्याची गाथा सांगितली जाणार आहे. या कथेचा समारोप दि.१७ ऑगस्ट बुधवारी महाप्रसाद वितरणाने केला जाणार आहेत.
त्यानंतर दि. १८ पासून संगीतमय शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून, शिवपुराण कथेचे प्रवचन भागवताचार्य विदर्भ केशरी स्वामी हभप. सारंग चैतन्यजी महाराज रा अमरावती यांच्या मधुर वाणीतून भगवान शिवशंकर भोलेनाथांच्या विविध लीला आणि त्यांचे झाकीच्या स्वरूपात दर्शन उपस्थितांना घडविले जाणार आहे. शिवपुराण कथा सोहळा संपताच दि.२५ ऑगस्ट रोजी भव्य महाप्रसादाव्या पंगतीने समारोप केला जाणार आहे. तीनही धार्मिक प्रवचन व संगीत कथा श्रवण कार्यक्रम येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात दररोज दुपारी ०२ ते ०५ वाजेपर्यंत चालणार आहे. तेंव्हा पवित्र श्रावण मासात आयोजित धार्मिक कार्यक्रमाचा लाभ शहरासह पंचक्रोशीतील भाविक - भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, यांच्यासह सर्व संचालक मंडळींनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.