नांदेड| मुदखेड तालुक्यातील माळकौठा, आमदुरा रोड करतांना सार्वजनिक बांधकाम विभागाने पाईप न टाकल्यामुळे शंखतिर्थ परिसरातील शेकडो एकर जमिनीमध्ये पाणी साचत असलेली तक्रार शेतकर्यांनी सा.बां.विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुदखेड तालुक्यातील माळकौठा, आमदुरा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने 2015 साली केला होता. या रस्त्यावर वासरी आणि शंखतिर्थ शिवाराजवळ गट नं.177 मध्ये रस्ता करतांना पाईप टाकण्याचे काम जाणिवपूर्वक सोडून देण्यात आले. आणि या परिसरात बाकी संपुर्ण रस्ता डांबरीकरण झालेला असतांनाही केवळ पाईपचा भाग खडी टाकून ठेवला आहे. त्यामुळे शिवाराजवळील शेकडो एकर शेतामध्ये पाणी निचरा न झाल्याने शेतात पाणी साचून शेत पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.
या संदर्भात बाधीत शेतकर्यांनी सातत्याने बांधकाम विभागाकडे तक्रारीही केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने बाधित शेतकरी वैतागले आहेत. रस्त्यात पाईप टाकण्याचे काम तत्काळ पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करु असा इशारा दाजीबा माणीका येडे व इतर बाधीत शेतकर्यांनी एका निवेदनाद्वारे बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिला आहे.