आखाडा बाळापूरात जबरी चोरी, चोरट्यांच्या मारहाणीत दवाखान्यातील कर्मचारी गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
हिंगोली। आखाडा बाळापूर (ता.कळमनुरी) येथील नवीन बसस्थानका जवळ असलेल्या दवाखान्यात चोरट्यांनी धुमाकुळ घालत कर्मचाऱ्याला मारहाण करून गंभीर जखमी केले त्यानंतर डॉक्टर सचिन देशमुख यांच्या बेडरुमचा दरवाजा तोडून आता प्रवेश करून त्यांच्या सात वर्षाच्या मुलाच्या गळ्याला चाकू लाऊन सुमारे सात लाखांचा ऐवज पळविला. रविवारी ता. २४ पहाटे अडीच वाजता हा प्रकार घडला आहे. पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकून चोरट्यांनी पळ काढला.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथील नवीन बसस्थानक परिसरात डाॅ. सचिन देशमुख यांचा दवाखाना आहे. या दवाखान्याच्या वरच्या मजल्यावर डॉ. देशमुख हे कुटंबासह राहतात. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास काही चोरटे एका स्कॉर्पीओ वाहनाने दवाखान्याजवळ आले. त्यांनी दवाखान्याच्या पाठीमागील ग्रिल तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तेथे असलेल्या कर्मचारी विशाल होळगे यास मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी होऊन खाली पडला.
त्यानंतर चोरट्यांनी दवाखान्यावर असलेल्या डॉ. देशमुख यांच्या बेडरुमच्या दरवाज्यावर लाथ मारून दरवाजा तोडला. यावेळी डॉ. देशमुख कुटुंब जागे झाले. बेडरुमध्ये आलेल्या दोन चोरट्यांनी डॉ. देशमुख यांच्या सात वर्षाच्या मुलगा श्रीयंश देशमुख याला ताब्यात घेऊन त्याच्या गळ्याला चाकू लावला. ‘तुम्हारे पास जो है वो जल्दी दो वरण बच्चे को मार डालेंगे’ अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या डॉ देशमुख कुटुंबियांनी त्यांच्या जवळीस सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांना दिली. तसेच चोरट्यांनी कपाटात उचका उचक केली. मात्र पोलिसांच्या वाहनाचा सायरन वाजल्याने चोरटे पसार झाले. त्यानंतर जखमी विशाल यास उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी भेट दिली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान पथक जागेवरच घुटमळले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
साई नगरात दोन घरांमध्ये चोरी - आखाडा बाळापूर येथील साई नगर भागातील दोन ते तीन घरे फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे आखाडा बाळापूरात एकच खळबळ उडाली आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून तपासले जाणार ः शिवाजी बोंडले उपनिरीक्षक आखाडा बाळापूर पोलिस ठाणे
या घटनेमध्ये नेमके चोरटे किती जण होते ते कोणत्या वाहनाने आले होते याची खात्री पटलेली नाही. त्यामुळे बसस्थानक परिसरातील दुकानांच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.