अर्धापूर ते फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गाचे पूल व रस्त्याचे काम रखडल्याने नागरीकातून व्यक्त होतेय नाराजी
हिमायतनगर| अर्धापूर फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हिमायतनगर ते घारापुर रोडवर रोज वाहनं फसत आहेत. आज सकाळी घारापुर जवळील नाल्यात नेपाळ मधून आलेल्या यात्रेकरूंची गाडी फसली असता घारापुर येथील गावकरी व लखन भीमराव शिंदे यांनी स्वतच्या ट्रक्टर ने रस्ता करून त्याची गाडी काडून दिली. त्याबद्दल यात्रेकरूंनी गावकऱ्यांचे आभार मानले असले तरी गावकऱ्यांनी ठेकेदाराने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन येतील रस्त्याचे व पुलाचे काम लवकरात लवकर करून द्यावे अशी मागणी केली आहे.
अर्धापूर ते फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची कामातील दिरंगाई आणि हलगर्जीपणामुळे अनेक पुलाची व काही ठिकाणी रस्त्याची कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अल्पसा पाऊस होताच वाहने फसत असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. एव्हडेच नाहीतर हिमायतनगर शहराकडून घारापुर फाटायपर्यंतच्या रस्त्याची सुद्धा दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे दुचाक्यांसह इतर वाहनांची घसरगुंडी होत असून, अनेक वाहनधारक पडून जखमी होत आहेत. तर मोठी वाहने फसून बसल्यावर हा मार्गाचा बंद पडतो आहे. असे प्रकार घडत असताना देखील या भागातील आमदार -खासदार यांच्यासह अभियंत्याचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाश्यासह गावकऱ्यांना ये- जा करताना जीव धोक्यात घालून रास्ता पार करावा लागतो आहे. एखाद्याचा बळी गेल्याशिवाय या रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण होणार नाही का असा सवाल समोर येत आहे.
असे असताना संबंधित ठेकदाराकडून अडचणीच्या ठिकाणची कामे तातडीने करण्यात हलगर्जीपणा दाखविला जात असल्याचा आरोप वाहनधारक - नागरीकातून केला जात आहे. या प्रकारामुळे आज घारापुर पुलावर यात्रेकरूंची लक्झरी बस फसल्याने त्यांची मोठी दैना झाली आहे. तर घारापुर फाट्यानजीक जड वाहतुकीचा ट्रक फसल्याने विदर्भ - मराठवाड्याची वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे. या प्रकारामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण होत असून, हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने तातडीने किमान एका बाजूने तरी रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी सोडवावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास रामदिनवार, माधव शिंदे आदींसह घारापुरी, हिमायतनगर, बोरी, चाथरी, ब्राह्मणगाव, टेम्भूर्णी, दिघी, विरसनी येथील नागरिकांनी केली आहे.