येत्या २०,२१ ऑगस्ट रोजी मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर येथे संपन्न होणार - एस.एम देशमुख -NNL


पुणे।
मराठी पत्रकार परिषदेचे ४३ व्दैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन येत्या दि.२० आणि २१ ऑगस्ट २०२२ रोजी पुण्यानजिक लोणी काळभोर येथील एमआयटीच्या भव्य परिसरात होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज येथे केली. परिषदेचे हे अधिवेशन कोरोनामुळे यापुर्वी दोन वेळा रद्द करावे लागले होते.

पुणे जिल्हा पत्रकार संघ,महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद आणि हवेली तालुका पत्रकार संघाची संयुक्त बैठक नुकतीच पुण्यात पार पडली.परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि परिषदेचे नियोजित अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी बैठकीस मार्गदर्शन केले.यावेळी हवेली तालुका पत्रकार संघ,पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि सोशल मिडिया परिषदेने अधिवेशन घेण्याची तयारी दर्शविली असून त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने मान्यता दिली आहे.त्यामुळे दि.२० आणि २१ ऑगस्ट रोजी हे अधिवेशन परिषदेच्या परंपरेला साजेशे भव्य दिव्य स्वरूपात साजरे होत आहे.खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे हे या ४३ व्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असतील.


परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख,शरद पाबळे,पुणे जिल्हा संघटक सुनील जगताप,सोशल मिडीया परिषदेचे जिल्हा प्रमुख जनार्दन दांडगे,हवेली तालुका अध्यक्ष बापुसाहेब काळभोर, सुनील वाळुंज यांनी काल एमआयटी परिसराची आणि ज्या विश्वविख्यात डोममध्ये अधिवेशन होत आहे त्याची पाहणी केली तसेच एमआयटीचे विश्वस्त मंगेश कराड यांची भेट घेऊन चर्चा केली.

दोन दिवसाच्या अधिवेशनात परिसंवाद,चर्चासत्र,मुलाखती असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन आणि समारोप होणार असल्याने लोणी काळभोरचे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आहे. ४२ वे राष्ट्रीय अधिवेशन दि.१८ व १९ ऑगस्ट २०१९ रोजी नांदेड येथे झाले होते त्यानंतर कोरोनामुळे अधिवेशन होऊ शकले नव्हते. आता हे अधिवेशन होत असल्याने देशातील मराठी पत्रकारांना अधिवेशनाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी