पैनगंगा नदी काठावरील अतिवृष्टी बाधित गावांना तात्काळ मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश -NNL


हिंगोली/नांदेड/यवतमाळ।
हिंगोली लोकसभा मतदार संघातील पैनगंगा नदीपात्रांच्या काठावर वसलेल्या हदगाव , किनवट, उमरखेड व वसमत विधानसभा मतदार संघातील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे शेतीपिकांसह जनावरे दगवाली आहेत. सध्या या गावातील नागरीकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना प्रशासनाकडुन तातडीची मदत द्यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड, हिंगोली व यवतमाळच्या जिल्हाधिकारी यांना आदेश  दिले असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली 

खासदार हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.२३) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन हिंगोली लोकसभा मतदार संघातील पैनगंगा नदीच्या काठावरील नागरीकांना प्रशासनाकडुन वेळेवर मदत दिली जात नसल्याची माहिती दिली. त्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना भ्रमनध्वनी वरुन संपर्क साधत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याच्या सुचना दिल्या आहेत. 

काही दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदार संघात संततधार पाऊस झाल्याने या पावसाचा शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. वसमत, किनवट, माहूर, हदगाव, उमरखेड विधानसभा क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी गोठ्यात बांधलेली जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. तेंव्हा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकपाहणी करुन पंचनामे करण्यात वेळ न घालवता नुकसानग्रस्त नदी काठावरील शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ आर्थिक मदत द्यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांना आदेश दिले.

खासदार हेमंत पाटील यांनी राष्ट्रपती निवडणूकीस दिल्लीला जाण्यापूर्वी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील  किनवट, हिमायतनगर तालुक्यासह अप्पाराव पेठ, इस्लापूर , वडगाव, सरसम, वसमत तालुक्यातील कुरुंदा मंडळातील अनेक भागाचा दौरा केला. व शेतीचे आणि नागरिकांच्या घरांची पडझड होऊन नुकसान झाल्याचा आढावा घेतला होता. मुसळधार झालेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.  शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचे पूर्ण पीक गेले आहे. पुरामुळे शेतीसुद्धा खरडून गेल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी दुबार आणि तिबार पेरणी केल्यानंतर नुकत्याच उगवलेल्या सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी जमीनच खरडून गेल्याने आता पेरायचे कुठे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

 खासदार हेमंत पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला व घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नुकसानग्रस्त याभागातील शेती आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अर्थीक मदत देण्यात यावी. प्रशासनाकडुन देण्यात येणाऱ्या आर्थिक मदत कामात दिरंगाई करू नये अश्या सूचना खासदार हेमंत पाटील यांनी संबंधितांना दिल्या.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील गावात पुराचे पाणी शिरल्यानंतर देखील पुरबाधितांना प्रशासनाकडुन रात्री उशिरापर्यंत कुठलीही मदत दिली गेली नसल्याचे समजताच खासदार हेमंत पाटील यांनी रात्री ११ वाजता कुरुदा गावास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन प्रशासनास चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान गावातील पुराची भिषणता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर कुरुदा गावास शासनाकडुन पावनेदोन कोटी रुपयाची तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच  पुल व रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या सुचना खासदार हेमंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या आधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी