नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.80 मि.मी. पाऊस, सर्वाधिक पाऊस हिमायतनगर तालुक्यात
नांदेड, अनिल मादसवार| शहरासह जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून संततधार पाऊस झाला आहे. अधून - मधून पावसाचा जोर वाढत असल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून, हिमायतनगर, किनवट व धर्माबाद तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे काल सकाळी 11.20 वाजता 2 गेट उघडून 24437 क्युसेसने पाण्याचा गोदावरी नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. या मुसळधार पावसामुळे शेत शिवारात शिल्लक राहिलेली पिकेही धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात बुधवार 27 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 19.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 728.40 मिलीमीटर पाऊस झाला असून, सर्वाधिक पाऊस हिमायतनगर तालुक्यात झाल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र यासह अनेक गावांना पुराचा वेडा पडल्याने मार्ग बंद झाले होते. तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे एक रुग्णवाहिका चार तास अडकून पडली होती, अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून विविध गावाला जाण्याच्या रस्त्यावरून पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद पडले आहेत. हिमायतनगर शहरातील मुख्य रस्ते हे जाम झाले असून, श्री परमेश्वर मंदिराचे कमान परिसर पूर्ण पाण्याच्या खाली आला आहे. याशिवाय धर्माबाद बाभळी रस्त्यावरून पाणी वहात आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. इतर तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे.
किनवट तालुक्यात सोमवारी रात्रीपासून सतत पाऊस सुरू आहे. सुरू असलेल्या रिमझिम पावसाने सकाळी जोर धरला असुन आज सकाळ पासून दिवसभर पाऊस सुरू आहे. त्यामुळे किनवटमधील नदी - नाले ओसंडून वाहत आहेत. छोट्या मोठ्या नद्यांना पूर आला आहे. सध्या सतत पाऊस सुरू आहे. सर्व ग्राम सेवकांना मुख्यालयी उपस्थित राहून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे बाबत आदेशित करण्यात आले आहे. इस्लापूर, जलधारा,शिवणी,आप्पारावपेठ या भागात जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.
कोसमेट, इस्लापूर, कुपटी, नांदगाव, आप्पारावपेठ, शिवणी, गोंडजेवली, मलकजामतांडा, मलकजाम, अमलापूर इ. गावचा संपर्क तुटला आहे. इस्लापूर ते किनवट रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. रेल्वे पुलाखाली पाणी खूप आहे. त्यामुळे रस्ता बंद आहे. तसेच हिमायतनगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक तब्बल सात तास ठप्प झाली होती.
जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.80 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात बुधवार 27 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 22 (680.60), बिलोली-13.40(775.40), मुखेड- 9.10 (669.70), कंधार-7.50 (689.80), लोहा-14.50 (650.20), हदगाव-16 (650.80), भोकर-32.70 (836.70), देगलूर-7.20 (627.10), किनवट-27.60 (801), मुदखेड- 32.10 (884.90), हिमायतनगर-81.50 (1010.60), माहूर- 15.60 (662), धर्माबाद- 12.60 (806.70), उमरी- 29.20(896.30), अर्धापूर- 24.10 (669.50), नायगाव-17.60 (665.80) मिलीमीटर आहे.