नांदेड| नांदेड तालुक्यातील मिलगेट ते नाळेश्वर रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडले असून प्रवाशांना ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यामुळे व सततच्या पडलेल्या पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. ते तात्काळ बुजवण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नाळेश्वर ते रहाटी रस्त्याच्या कामाचे डांबरीकरण अर्धवट झाले आहे. परंतु आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश बांधकाम विभागास दिले होते परंतु आ. कल्याणकर हे बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे दहा दिवस गेल्याची संधी साधून संबंधीत गुत्तेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी एका महिन्यापासून काम बंद केले आहे. रस्ता अर्धवट झाल्याने पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. रूग्णालयासाठी जात असताना मोटारसायकलवरून महिला रूग्ण व वृद्ध यांचेही अपघात झाले आहेत.
आ.बालाजी कल्याणकर हे दोन दिवस नांदेडला आले व पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाच्या विस्तार व राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी परत मुंबईला गेल्यामुळे रहाटी ते नाळेश्वर रस्त्याचे काम पुन्हा रामभरोसे झाले आहे.संबंधीत गुत्तेदार व सा.बा.च्या अधिकार्यांवर तात्काळ कार्यवाही करून अर्धवट असलेले रस्त्याचे कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी आ.बालाजी कल्याणकर यांनी दखल घ्यावी अशी मागणी पत्रकार आनंदा बोकारे व या भागातील नागरिकांनी केली आहे.