हिंगोली/नांदेड| नुकत्याच वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनच्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात केळी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने वसमत तालुक्यातील गिरगाव, खाजमापूर येथील नुकसानग्रस्त शेतीची खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशित केले.
यावेळी खासदार हेमंत पाटील म्हणाले की, अवकाळी पावसामुळे, मागील सहा दिवसांपासून वीजपुरवठा नसल्याने पिण्याच्या पाण्याचा व विजेचा गंभीर प्रश्ननिर्माण झाला आहे. संबंधित अधिकारी यांनी विजेच्या तुटलेल्या तारा व विजेच्याखांबांची झालेली नासधूस तात्काळ दुरुस्त करण्यास सुरुवात करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. विजेचा प्रश्न निर्माण झाल्याने अधिकारी फोन उचलत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या असून अधिकाऱ्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या अडी अडचणीला प्राधान्य देऊन काम करावे, असेही ते म्हणाले. वादळी वाऱ्यामुळे खाजमापूर वाडी येथील घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत त्या सर्व कुटुंबीयांचीभेट घेऊन तातडीने मदत करण्याच्या सुचना तहसीलदारांना दिल्या.
तसेच अनेक शेतकऱ्यांचे शेतातील सौरऊर्जा सोलार पॅनलचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना देखील शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी अशा सूचना खासदार हेमंत पाटील यांनी संबंधितांना दिल्या. हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, यासंदर्भात शेतकऱ्यांना पुरेपुर मदत मिळवून देण्यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्रीउद्धवजी ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे खासदार हेमंत पाटील म्हणाले .
तालुक्याचे तहसीलदार, महावितरण विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी, पिक विमा अधिकारी व एजंट यांना रविवारी सुट्टीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर बोलावून शेतकऱ्यांच्या शेतीपिकांची विशेषतः भुईसपाट झालेल्या केळी पिकांचे पंचनामे करून तात्काळ मोबदला मिळवून देण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी निर्देशित करून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी क्लेम केल्यास त्यांना पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मदत मिळवून द्यावी असेही ते म्हणाले.
यावेळी शिवसेना वसमत तालुका प्रमुख राजू चापके,औंढा तालुका प्रमुख अंकुश आहेर, गिरगांवचे सरपंच देविदास पाटील कऱ्हाळे, कुरुंदाचे सरपंच राजेश पाटील इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे, माजी सरपंच कुरुंदा दत्तारामजी इंगोले,पंढरीनाथ क्षीरसागर ,लक्ष्मीकांत देशमुख , रेडगाव सरपंच धनंजय पवार, युवासेना सरचिटणीस व्यंकटेश कऱ्हाळे, संभाजी सिद्धेवार, प्रमोद भुसारे, शिवराज यशवंते, रोडगासरपंच भद्रीनाथ कदम, बाबा अफूने, वसमत तहसीलदार अरविंद बोलंगे , तालुकाकृषि अधिकारी कल्याण पाड, उपअभियंता परचाके व असंख्य गावकरी, शेतकरी यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.