प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे
नांदेड, अनिल मादसवार| जिल्ह्यातील सर्व शाळा सोमवार दि.१३ जून रोजी सुरू होत असून विद्यार्थी उपस्थितीच्या शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी दिली आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमांच्या जिल्हा परिषद शाळा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शाळा, समाज कल्याण, महानगरपालिका, नगरपालिकांच्या शाळा, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित अशा एकूण २ हजार ९०९ शाळांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा तालुका स्तरावरून करण्यात आला आहे.
बालभारती लातूरहून नांदेड जिल्ह्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या ३ लाख ३३ हजार ९१२ विद्यार्थ्यांसाठी १८ लाख ३८ हजार ५७७ पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आलेले असून ही सर्व पुस्तके तालुका स्तरावरून शाळास्तरावर वितरित करण्यात आली आहेत. ३ लाख ३३ हजार ९१२ लाभार्थी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत.
तालुकानिहाय प्राप्त आणि वितरित केलेल्या पाठ्यपुस्तकांची संख्या अशी- आहे नांदेड 100656, अर्धापूर 74343 मुदखेड 86966, कंधार 16 5710,लोहा 178044, मुखेड 136038, देगलूर 140360, बिलोली 94824, नायगाव 117405, धर्माबाद 55239, हदगाव 126665, हिमायतनगर 75871, भोकर 73372, उमरी, 74165, किनवट 15 8865 आणि माहूर 77174 अशी एकूण 18,36,730 पुस्तके शाळास्तरावर वितरित करण्यात आलेली आहेत.
शाळास्तरावर प्राप्त झालेली पुस्तके आणि मागील वर्षाची शिल्लक पुस्तके यांची सांगड घालून विद्यार्थी निहाय पुस्तकांचे वितरण कसे करता येईल याचे व्यवस्थित नियोजन करून पाठ्यपुस्तके शाळा सुरू होऊन विद्यार्थी उपस्थितीच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
शालेय शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठीही नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळे कार्यक्रम आयेजित करण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. सर्व शाळांना आणि सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील असे नियोजन करून पुस्तकांचे वितरण करण्याच्या सूचना प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणांना दिल्या आहेत.