राष्ट्राचा खरा महानायक वर्गखोलीत राष्ट्र घडविणारा शिक्षक असतो - डॉ.गोविंद नांदेडे -NNL


नांदेड|
शिक्षकांनी अतिशय उत्साहाने, आनंदाने वर्गात प्रवेश केला पाहिजे. शिक्षक हा विद्यार्थ्यांची प्रतिमा साकारणारा आरसा असतो. जसे शिक्षक तसे विद्यार्थी, म्हणून शिक्षकांनी नेहमी चैतन्यदायी, प्रेरणादायी असायला हवे. शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये समवयस्क होऊन त्यांच्या सोबत नाचता, गाता, बागडता आले पाहिजे. आई, वडील, मित्र, गुरू या सगळ्या भूमिका पार पाडता आल्या पाहिजेत. एक शिक्षक हजारो प्रतिभावान आदर्श नागरिक घडवू शकतो. म्हणूनच मला वाटते की राष्ट्राचे महानायक हे चित्रपटातील पडद्यावर दिसणारे अभिनेते नसून राष्ट्र निर्माणाचे पवित्र कार्य करणारे शिक्षक आहेत. 

स्वामी विवेकानंद ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ व शहाजी शिक्षण संस्था संचालित अकरा शाळांच्या मुख्याध्यापक शिक्षकांना, तसेच अक्षर परिवाराने सुपरिचित वाजेगाव बीट मधील जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापक यांना प्रेरणा आणि येत्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्याकरिता प्रेरणा सभेचे आयोजन वाजेगाव येथील राष्ट्रमाता शाळेत करण्यात आले होते. याप्रसंगी राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे बोलत होते. दिगंबर पाटील क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, सचिव अवधूत पाटील क्षीरसागर वाजेगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा शेठ, डी के पाटील फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ अजय क्षीरसागर हे उपस्थित होते. 

श्री नांदेडे पुढे म्हणाले, ऊर्जेचा, उत्साहाचे प्रतीक असणारा निर्झर ज्याप्रमाणे स्वच्छ, खळाळते पाणी घेऊन प्रवाही असतो त्याप्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचार शक्तीला, सृजनाला प्रवाही केले पाहिजे. यासाठी स्वतः शिक्षकाने निरंतर अध्ययनशील असले पाहिजे. प्रामाणिक शिक्षकांनी स्वतःला कमी लेखू नये. कारण ते राष्ट्राचे भाग्यविधाते असतात. त्यांच्या इतके महान कोणीच नसते. शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना बोलू दिले पाहिजे. त्यांना सतत चिंतन, विश्लेषण, संश्लेषण करायला भाग पडेल असे प्रश्न विचारून बोलते करायला हवे. त्यांच्या मेंदूच्या प्रत्येक पेशीला उद्दिपित करायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यात प्रतिभा आहे, प्रज्ञा आहे गरज आहे फक्त तिला उजागर करण्याची. शिक्षकाने हीच भूमिका पार पाडावी. प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मसन्मान जपत त्यांच्या क्षमतांना विकसित करण्याची, त्यांच्या विचार शक्तीला चालना देऊन ज्ञानाची परिक्रमा अखंडित ठेवण्याची क्षमता शिक्षकांनी विकसित करायला हवी. 

प्रसन्नता ही संसर्गजन्य असते त्यामुळे शिक्षकांनी नेहमी प्रसन्न राहून शाळा आणि परिसर प्रसन्न राहील याची दक्षता घ्यावी. याप्रसंगी त्यांनी शिक्षकांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी संस्थेचे सचिव अवधूत पाटील क्षीरसागर यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा उद्देश आणि कार्यप्रणाली याची माहिती दिली. याप्रसंगी नुकत्याच आपला दीर्घ, यशस्वी कार्यकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या सुलोचना गोविंद नांदेडे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना शिक्षकांनी पूर्ण प्रामाणिकपणे, समर्पित भावनेने आपले कार्य केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. वाजेगाव बीटचे उपक्रमशील विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी, शिक्षकांनी प्रत्येक मूल स्वतःचे मूल असल्याप्रमाणे समजून आईची ममता देऊन विद्यार्थ्यांना घडविले पाहिजे. विद्यार्थी आमविश्वासाने समजात वावरला पाहिजे, त्याचे वक्तृत्व, व्यक्तिमत्त्व खुलले पाहिजे यासाठी बालसभा सारख्या उपक्रमांचे आयोजन प्रत्येक शाळेने करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

यावेळी प्रामुख्याने उपस्थित असलेले सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यांनी वेळेला महत्त्व देऊन प्रत्येकाने कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त अधिकचा वेळ शाळेसाठी देण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पाटील क्षीरसागर यांनी विद्यार्थी हित अग्रस्थानी ठेऊन विद्यार्थी विकास हेच अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्यास शिक्षकांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार इफ्तेकार अली यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रमाता शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम गाडेकर, डॉ अर्चना क्षीरसागर, विजय क्षीरसागर तसेच सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी