नांदेड। गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे माजी अध्यक्ष व शीख समाजातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व स. लड्डूसिंघ महाजन यांच्या अमृतमहोत्सवी जन्मोत्सवाचे आयोजन येत्या दि. 26 जून, 2022 रोजी तखत सचखंड हजुरसाहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी व आदरणीय पंजप्यारे साहिबान, संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, गुरुद्वारा मातासाहेबदेवाजी येथील जत्थेदार संतबाबा तेजसिंघजी यांच्या पवित्र सन्निध्यात तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तसेच राज्याचे पालकमंत्री मा. ना. श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षते खाली साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अमृतमहोत्सव जन्मोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी एका प्रसिद्धिपत्रकान्वय दिली आहे.
शीख समाजातील वरिष्ठ आणि अनुभवी नेते असलेले स. लड्डूसिंघ महाजन यांच्या अमृतमहोत्सव जन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष पद जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे सार्वजनिक निर्माण मंत्री मा. ना. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी भूषवाव असा ठराव संयोजन समितीतर्फे पूर्वीच मांडण्यात आला होता. त्यानुसार पालकमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दि. 26 जून रोजी सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम अध्यक्ष म्हणून त्यांची उपस्थिती राहणार आहे. तर कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे खासदार श्री एस. एस. अहलूवालिया, लोकसभेचे माजी उपसभापति श्री चरणजीतसिंघ अठवाल, माजी मंत्री महाराष्ट्र व माजी खासदार श्री भास्करराव जी पाटिल खतगावकर, माजी केंद्रीय राजयमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटिल, माजी उपसभापति आणि माजी राजयमंत्री श्री कमलकिशोर कदम, माजी राज्यमंत्री डॉ माधवरावजी किन्हाळकर, माजी राज्यमंत्री श्री डी. पी. सावंत, नांदेड जिल्ह्याचे खासदार श्री प्रतापराव पाटिल चिखलीकर, हिंगोलीचे खासदार श्री हेमंत भाऊ पाटिल, माजी खासदार श्री चंद्रकांत खैरे, विधानपरिषद सदस्य श्री अमरनाथ राजुरकर, नांदेड दक्षिणचे आमदार श्री मोहनराव हंबर्डे, नांदेड उत्तरचे आमदार श्री बालाजी कल्याणकर, नांदेडच्या महापौर श्रीमती जयश्री निलेश पावडे सह जिल्ह्याचे सर्व आमदार आणि अनेक क्षेत्रातील व्यक्तीमत्वांची उपस्थिती या कार्यक्रमास असणार आहे.
माजी आमदार पोकर्णा यांनी पुढे म्हंटलं आहे की स. लड्डूसिंघ महाजन हे नांदेड मधील लोकप्रिय व्यक्तिमत्व असून त्यांचे सर्व समाजाशी चांगले संबंध प्रस्थापित आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात दिल्ली, पंजाब, तेलंगाना आणि इतर ठिकाणाहून पाहुणे येणार आहेत. अबचल नगर येथील साहबजादा फतेहसिंघजी मंगल कार्यालयात वरील सोहळा साजरा होणार असून सर्वधर्मीय निमंत्रित पाहुणे आणि स्थानीक शीख समाजातील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. वरील सोहळा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीतील सर्व सदस्य परिश्रम घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.