गंगाखेड येथे मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यास उत्तम प्रतिसाद -NNL


गंगाखेड/परभणी।
मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीने आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा गंगाखेड येथे शुक्रवार, ६ मे रोजी घेण्यात आला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेल्या शेकडो पत्रकार व पदाधिकाऱ्यांची एकजूट यानिमित्ताने पहावयास मिळाली.

दरवर्षी घेण्यात येणारा राज्यातील आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा परभणी जिल्ह्यातील संत जनाबाईची जन्मभूमी असलेल्या गंगाखेडनगरीत घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, संत जनाबाई यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, स्वागताध्यक्ष गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे,कोषाध्यक्ष विजय जोशी, प्रमुख वक्ते म्हणून न्यूज एटीएनचे वृत्त निवेदक विलास बडे यांची उपस्थिती होती. 

स्वागतपर भाषण करतांना पिराजी कांबळे यांनी गंगाखेड नगरीचे ऐतिहासिक महत्व विषद करत कार्यक्रम घेण्याची भूमिका मांडली. परिषदेचे राज्य प्रसिद्धी  प्रमुख अनिल महाजन यांनी मराठी पत्रकार परिषदेने पत्रकारांसाठी केलेल्या कामाचा आढावा घेत, पत्रकार संरक्षण कायदा, पेन्शन योजना आदी प्रश्‍न मार्गी लावल्याचे स्पष्ट केले. मेळाव्यानिमीत्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी विचार व्यक्त करतांना समाजाने पत्रकारांच्या मागे उभे राहणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. 

तसेच पत्रकारांनीही परिषदेच्या पाठीमागे उभे राहून आपली शक्ती दाखवण्याची वेळ असल्याचे सांगितले. परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मस्थळी भव्य स्मारक उभे करण्यात आले असून त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. परिषदेकडे सभासद नोंदणी करून जास्तीत जास्त वर्गणी पाठविण्याचे आवाहन केले. याप्रसंगी स्वागताध्यक्षीय भाषणात आ.गुट्टे म्हणाले, कै.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीसाठी शासनाने यावर्षी २५ कोटी रुपये दिले आहेत. तसेच छोट्या वृत्तपत्रासाठी जाहिरात दरही वाढविण्यात आले आहेत. 

यावेळी त्यांनी २०१४ व २०१९ मध्ये त्यांनी लढविलेल्या विधानसभा निवडणुकीचा विजय व पराभव याबद्दल सविस्तर विवेचन करत आलेल्या अडचणींवर कशी मात केली, याचा उहापोह केला. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख हे पत्रकारांसाठी कशाप्रकारे परिश्रम घेत आहेत, याबद्दल त्यांनी गौरवोद्‌गार काढले. वृत्त निवेदक विलास बडे यांनी कॉर्पोरेट पत्रकारिता कशाप्रकारे सुरु आहे, याबद्दल विवेचन केले. भारत देश आपण खेड्याचा संबोधतो परंतु मोठे वृत्तपत्र केवळ ग्रामीण भागाला ०.६७ टक्के प्रसिद्धी देत आहेत. तर दुसरीकडे दिल्लीसारख्या ठिकाणचे प्रश्‍न ६८ टक्के मांडण्यात येत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागावर अन्याय होत असून त्यांचे प्रश्‍न दाबले जात असल्याचे स्पष्ट केले. 

अध्यक्षीय समारोप करतांना परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी गेल्या दोन वर्षापासून पत्रकारांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री महोदय पत्रकारांना भेटण्यास वेळ देत नाहीत. अशावेळी पत्रकारांनी करायचे काय? असा प्रश्‍न उपस्थित केला. समाज तसेच प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे मालक देखील पत्रकारांसोबत नसल्याने त्यांच्यापुढे मोठे आव्हान असल्याचे नमूद केले. पत्रकारांनी यासाठी एकत्र येऊन संघटन मजबूत करणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. छोटी वर्तमानपत्रे जगली पाहिजे, मोठा वृत्तपत्र समुह असलेले (लोकप्रभा) सारखे साप्ताहिक बंद झाले. यामुळे येणारा काळ वृत्तपत्रासाठी कठीण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार संरक्षण कायदा झाला परंतु त्याची राज्यात अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त केली. 

येणाऱ्या  १७ मे रोजी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांना या दिवशी सर्व पत्रकारांनी एसएमएस पाठवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठीच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर राजेभाऊ फड, गणेश रोकडे, किसन भोसले, बालासाहेब निरस, ॲड.संतोष मुंडे, विष्णू मुरकूटे, संदीप अळनुरे, तुकाराम मुंडे, विजय जोशी, अनिल महाजन, सुरेश नाईकवाडे, प्रकाश कांबळे, विशाल साळूंके, नंदकुमार महाजन, अनिल वाघमारे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब राखे यांनी केले तर आभार गोविंद चोरघडे यांनी मानले.

पुरस्कार विजेते तालुका पत्रकार संघ

कोल्हापूर विभाग सिंधुदुर्ग जिल्हा सावतंवाडी, कोकण विभाग गुहागर पत्रकार संघ, नाशिक विभाग ञ्जामखेड, पुणे विभाग फलटण, अमरावती विभाग रिसोड, नागपूर विभाग ञ्नरखेड, औरंगाबाद विभाग सिल्लोड, लातूर विभाग नायगाव

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी