नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा चोविसावा दीक्षान्त समारंभ बुधवार दि. १ जून २०२२ रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठ परिसरातील दीक्षान्त सभागृहामध्ये पार पडणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल तथा मा.कुलपती श्री. भगतसिंह कोश्यारी भूषविणार आहेत.
चोविसाव्या दीक्षान्त समारंभास सन्माननीय अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. उदयजी सामंत असणार आहेत. त्याचबरोबर नवी दिल्ली येथील वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक व वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे माजी सचिव डॉ. शेखर सी. मांडे हे प्रमुख पाहुणे स्नातकांना उद्देशून दीक्षान्त भाषण करणार आहेत. यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंहबिसेन यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आसणार आहे.सकाळी११:०० वा.विद्वंतजणांचे मिरवणूकीद्वारे दीक्षान्त सभागृहाकडे आगमन होणार आहे. विद्यापीठाचे गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे भाषण होणार आहे. शेवटी दीक्षान्तसमारंभाची समाप्ती घोषणा होऊन राष्ट्रगीताद्वारे कार्यक्रमाची सांगता होईल.
विद्यार्थी तथा अभ्यागतांसाठी काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थ्यांनी सकाळी १०:४० वा. पूर्वी दीक्षान्त सभागृहामध्ये येऊन आपले आसन ग्रहण करावे. सभागृहामध्ये येताना फोटोओळखपत्र आवश्यक आहे.विद्यार्थी तथा अभ्यागतांनी कार्यक्रम स्थळी येतांना सोबत कॅमेरा, हॅंडबॅग, ब्रिफकेस, लॅपटॉप, आयपॅड, खाण्याचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्या घेऊन येऊ नये, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी केले आहे.