पेठवडज गावाच्या नागरी समस्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी नारायण गायकवाड यांचा रखरखत्या उन्हात अर्धनग्न पैदल मार्च -NNL


नांदेड/कंधार|
कंधार तालुक्यातील पेठवडज गावातील नागरिकांच्या समस्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी पेठवडज ग्रामपंचायतचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड हे आपल्या गावकऱ्यांसह 45 अंश सेल्सिअस तापमानात पेठवडज ते नांदेड असा पैदल मार्च काढला आहे.

कंधार तालुक्यातील पेठवडज गाव हे परिसरातील मोठे गाव म्हणून परिचित असून परिसरातील मोठी बाजारपेठ म्हणूनही या गावाकडे बघितले जाते. जुना इतिहास असलेल्या या गावाकडे मात्र अलीकडच्या काळात राजकारण्यांनी सकारात्मक न बघितल्यामुळे या गावातील नागरिकांच्या समस्यात मोठी वाढ झाली आहे. निजाम काळापासून आपली वेगळी ओळख असलेले व परिसरातील 20 ते 25 गावांचा संपर्क असलेले पेठवडज गाव समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. 

या गावाला मोठे जलाशय असून या जलाशयाच्या निचरा होणाऱ्या पाण्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हत्तीपाय व हायड्रोसिल रुग्णांची संख्या या गावात लक्षणीय आहे. गावातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट नसल्यामुळे गावालगत पाण्याचे डबके तयार झाले आहेत. त्यामुळे साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. गावाला चारही बाजूंनी रस्ते असले तरीही एकही रस्ता दळणवळणासाठी अनुकूल नाही. 

सर्वच रस्ते ओबडधोबड व मागील अनेक वर्षापासून दुरुस्तीशिवाय बकाल झाले आहेत. त्यामुळे रात्री-बेरात्री रुग्णांना शहरात अनण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. गावातील रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशा स्थितीत आहे. या ठिकाणी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्यामुळे पेठवडज सह परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक अशावेळी ही आरोग्य सेवा मिळत नाही. परिसरातील गावांसाठी पेठवडज हे गाव महत्त्वाचे असून गावात बँक अथवा पोस्ट ऑफिस कार्यालय सक्षम नसल्यामुळे पेठवडज व परिसरातील नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना शासनाच्या अनेक योजना पासून वंचित राहावे लागत आहे. 

गावात पोलीस ठाण्याची आवश्यकता असल्याची मागणी नारायण गायकवाड यांनी मागील अनेक वर्षापासून शासनाकडे लावून धरली आहे. परंतु या मागणीकडे प्रशासनाच्या वतीने कानाडोळा करण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या कामासाठी नागरिकांना 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या कंधार येथील पोलिस ठाण्यात जावे लागते. त्यामुळे अनेकदा या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यासह अनेक अडचणी व मूलभूत नागरी समस्या पेठवडज येथील नागरिकांच्या असून वारंवार या मागण्या पूर्ण कराव्यात. प्रशासनाने व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी व या समस्या सोडवाव्यात अशी मागणी नारायण गायकवाड यांनी केली आहे. 

या गावाला विद्यमान जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्यासह दोन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असली तरी त्यावर कारवाई मात्र शून्य आहे. त्यामुळे आपल्या गावाच्या समस्या कडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे लक्ष वेधावे व त्यांनी या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती पहावी. यासाठी नारायण गायकवाड यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला 30 एप्रिलला पेठवडज ते नांदेड भर उन्हात पैदल मार्च काढला आहे. याउपरही पालकमंत्र्यांनी दखल न घेतल्यास नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशाराही या गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी