डॉ.काब्दे यांची हॅट्रिक
औरंगाबाद| मराठवाडा जनता विकास परिषद औरंगाबादच्या अध्यक्षपदी माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे यांची आज पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा जनता विकास परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा औरंगाबाद येथील स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या सभागृहात शनिवार दि.30 एप्रिल रोजी डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मजविपचे मागील कार्यकाळात मयत झालेले सदस्य व इतर मयत मान्यवरांना प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक सचिव जीवन देसाई यांनी केले. बैठकीत मागील कार्याचा आढावा सहसचिव प्रा.अशोक सिद्धेवाड यांनी मांडला तर कोषाध्यक्ष इंजि. द.मा. रेड्डी यांनी आर्थिक अंकेक्षण अहवालाचे वाचन केले.
यावेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्राचार्य डॉ. जगदीशचंद्र खैरनार यांची निर्वाचन अधिकारी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी डॉ.व्यंकटेश काब्दे यांचे नाव परभणी येथील अंनंतराव देशमुख यांनी सुचवले त्याला लातूर येथील प्राचार्य सोमनाथ रोडे व वसमत येथील ऍड.रामचंद्र बागल यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डॉ.व्यंकटेश काब्दे यांचे एकच नाव आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.खैरनार यांनी डॉ.व्यंकटेश काब्दे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दगडे, डॉ.अशोक बेलखोडे, प्राचार्य सोमनाथ रोडे, प्राचार्य गोपाळराव कदम, के.के. पाटील, सु. म. गायकवाड, ऍड.रामचंद्र बागल, इंजि. शंकरराव नागरे इत्यादींनी आपली मते मांडली. यावेळी औरंगाबादचे गोपीनाथ वाघ, सुमंत झा, प्रा.अर्जुन जाधव, नांदेड जिल्हाध्यक्ष द.मा.रेड्डी, शहराध्यक्ष प्रदीप नागापूरकर, परभणीचे विश्वनाथ थोरे, प्रा.बालाजी कोंपलवार, प्रा.लक्ष्मण शिंदे, प्रा.डी.एन. मोरे, प्रा. विकास सुकाळे, जे. पी. मिसाळे, रामराव थडके, भाऊराव मोरे इत्यादीसह मराठवाड्यातील विविध जिल्हा व शहर शाखा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.