उद्योजक संजय बियाणी यांच्या निर्घृण हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक - पालकमंत्री अशोक चव्हाण -NNL

▪️हत्या मनाला वेदना देणारी ▪️दोषींविरुद्ध कठोर कारवाई करू
 

नांदेड,अनिल मादसवार।
जिल्ह्यातील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक, सेवाभाव जपणारे तरुण उद्योजक संजय बियाणी यांची काल जी निघृण हत्या झाली ती मनाला अत्यंत वेदना देणारी आहे. ज्या पद्धतीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या ते दृष्य पाहून मी रात्रभर झोपू शकलो नाही. जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून मी आढावा घेतला. हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई समवेत या घटने पाठिमागे जे कोणी सुत्रधार असतील त्यादृष्टिने पोलीस यंत्रणा तपास करेल. या घटनेच्या संपूर्ण चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली केली करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी व पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी याबाबत माही दिली आहे. या घटनेचा संपूर्ण तपास निष्पक्षपातीपणे केला जाईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 


गोवर्धन घाट येथे आज दुपारी 1.30 वा. उद्योजक स्व. संजय बियाणी यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी शोकसभेत ते बोलत होते. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, कोळंबीचे सरपंच हरी देशमुख, माहेश्वरी सभाचे पदाधिकारी किशन भन्साळी, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, विविध पदाधिकारी उपस्थित होते.
 
झालेल्या घटनेचे दु:ख सर्वांनाच आहे. आगामी काळात नांदेडमध्ये अशा प्रकारची एकही घटना होता कामा नये, यासाठी संबंधित यंत्रणेला दक्षतेच्या व या घटनेच्या तपासाच्या मी सूचना दिलेल्या आहेत. याच्या पाठिमागे जे कोणी सुत्रधार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, ही माझीपण मागणी आहे. उद्या मी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत योग्य दिशेने तपास पोलीसांना करता यावा यादृष्टिने मी सूचना केल्या असल्याचे पालकमंत्री अशोक  चव्हाण यांनी सांगितले. संजय बियाणी यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. त्यांचे म्हणणे पोलीस तपास अधिकारी लक्षात घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन वर्षापूर्वी उद्योजक संजय बियाणी यांच्यावर धाक दाखवून गुन्हेगारांनी पैशाची मागणी केली होती. घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. आज सकाळी आम्ही, पालकमंत्री अशोक चव्हाण बियाणी यांच्या घरी जाऊन सांत्वन करून आलो आहोत. सेवाभाव जपणाऱ्या तरुण उद्योजकावर ही अवस्था का यावी असा उद्ग्वीग्न सवाल खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला. खरा सूत्रधार शोधून काढल्याशिवाय उद्योजकांमधील भय दूर होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. घडलेल्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. बियाणी हे सर्वांचे मित्र होते. एक चांगल्या उद्योजकाची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरीत पकडून कठोर कारवाई करण्यामध्ये शासन कमी पडणार नाही असे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले.


गत 20 वर्षात हजारो घरे तरुण उद्योजक बियाणी यांनी बांधली.  व्यावसायिक असूनही सामाजिक प्रश्नांची जाण ठेवणे, आपले सामाजिक उत्तरदायीत्व निभावण्यासाठी पुढे येणे यातून त्यांनी ओळख निर्माण केली. या तरुण उद्योजकाचा मृत्यू  हळहळ करायला लावणारा असल्याचे खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी सांगितले. आरोपीला त्वरीत अटक करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी आपल्या कठोर भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी