पर्यावरण क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे काम दिशादर्शक राहिल – विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर -NNL


सातारा|
अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ  हे  वातावरणातील बदलाचे दुष्परिणाम  हे समाजातील प्रत्येक घटकाला जाणवत आहेत. पुढच्या पिढीला हे परिणाम जाणवू लागू नये म्हणून आतापासूनच पर्यावरण संवर्धनाचे काम करावे लागेल. भविष्यात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे काम दिशादर्शक राहिल, अशी ग्वाही विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात “ग्लोबल वॉर्मिंग-ग्लोबल वॉर्निंग” जागतिक तापमानवाढीमुळे होणारे हवामानातील बदल, त्यांचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा आणि दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब, डिस्ट्रीक्ट 3234- डी 1 यांच्या संयुक्त विद्यमाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. नाईक-निंबाळकर बोलत होते. 

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार वंदना चव्हाण, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, कामधेनु विद्यापीठाचे कुलगुरु मदनगोपाल वार्षणेय, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, डॉ. अविनाश पोळ, डॉ. गुरुदास नुलकर, सिने अभिनेते आमिर खान (ऑनलाईन), सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, लायन्स क्लबचे सुनिल सुतार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, लायन्स क्लबचे सदस्य, पर्यावरण प्रेमी ऑनलाईन उपस्थित होते.

आतापर्यंत माणूस हा निसर्गाशी संघर्ष करीत जगत आला आहे, असे सांगून श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनीही या आव्हानाला तोंड देत पिक पद्धतीत बदल केला पाहिजे. वातावरणातील बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी शासन आपल्या परीने काम करीत आहे. या कामात लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी सहभाग घेतला पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले जाईल. यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग घेऊन यापुढे पर्यावरणासाठी काम करीत राहणार असल्याचेही श्री. नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. 

पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी ग्रामीण भाग केंद्र मानून शाश्वत विकास आराखडा तयार करा - विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

वातावरणातील बदलामुळे संपूर्ण ऋतुचक्र बदलले आहे. कधीही पाऊस पडतो, गारपीट, ढग फुटी अशा संकटांना सर्वांनाच सामारे जावे लागत आहे. यामुळे जैवविविधतेवर परिणाम होत आहे. महसूल विभागाने वातावरणातील बदल रोखण्यासाठी आराखडा तयार करावा. ग्रामीण भागात सामाजिक काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा सहभाग घेऊन पाणी व्यवस्थापन, बायोगॅस, सौर ऊर्जा, इतिहासकालीन पाण्याचे स्त्रोत यांचे संरक्षण व संवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन,पर्यावरण प्रेमी पर्यटन या उपक्रमाबाबत ग्रामीण भाग केंद्र  मानून शाश्वत आराखडा तयार करावा, असे विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सां‍गितले.

सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी तालुक्याचा एक आराखडा तयार करावा. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात यावा. यामध्ये शाश्वत विकासावर भर देण्यात यावा.  प्रत्येक नगर पालिकेने कचरा प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे करावेत. त्याचबरोबर बायो मेडिकल वेस्ट प्रक्रियेची नगर परिषदेने वेळोवेळी तपासणी करावी. पर्यावरणाचा समातोल राखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले.

वातावरणातील बदलानुसार शेतकऱ्यांनी पिक पद्धतील बदल करावा - पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

वातावरणातील बदलाचे परिणाम जास्त करुन शेतकरी भोगत आहेत. अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. वातावरणातील बदलानुसार शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करुन  प्रत्येकानेही जीवन शैलीत बदल केला पाहिजे, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

वातावरणातील बदलाचे परिणाम प्रत्येकाला भोगावे लागत आहे. राज्यात जवळपास 51 ते 53 टक्के शहरीकरण झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिक शहरी भागात स्थलांतरीत होत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात वनसंपदा वाढली पाहिजे, जंगले राहिले पाहिजे तसेच खेळाची मैदानेही राहिली पाहिजेत. वातावरणातील समातोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन योगदान द्यावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

सौउ ऊर्जेचा वापर, सार्वजनिक वाहतुक पर्यावरण पुरक वाहनांची खरेदी केली पाहिजे. तसेच पडणाऱ्या प्रत्येक पाऊसाचा थेंब हा जमिनीत मुरला पाहिजे. तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिबकचा वापर केला पाहिजे.  महानगर पालिका, नगर परिषदा व ग्रामपंचायतींनी कचरा व्यवस्थापनावर काम केले पाहिजे. शासनामार्फत नद्यांच्या स्वच्छतेच्या कामाबरोबर वृक्ष संपदा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. यात सर्वांनी सहभाग नोंदवावा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व लायन्स क्लबने  निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जे काम हाती घेतले आहे त्याचा इतरांनी आदर्श घ्यावा, असेही आवाहन श्री. ठाकरे यांनी यावेळी केले. यावेळी खासदार वंदना चव्हाण, कुलगुरु मदनगोपाल वार्षणेय, डॉ. अविनाश पोळ, डॉ. गुरुदास नुलकर, मृण्मयी देशपांडे यांनीही परिसंवादामध्ये मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी