बीड। एक धक्कादायक प्रकार, बीड जिल्ह्यात समोर आला आहे. जिवंत असलेल्या नायब तहसीलदार महिलेस मयत दाखवून चक्क तिचे मृत्यु प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकचं खळबळ उडाली आहे. कौटूंबिक कलहातून, भावाने जिवंत नायब तहसीलदार असणाऱ्या बहिणीचे मृत्यू प्रमाणपत्र काढले आहे. तर हा अजब प्रकार कारभार चाळीसगावच्या नगरपालिकेने केला असून संपत्तीचा वाद सुरू झाल्यानं, हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलच्या उपयुक्तांचे एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना आले. त्यात केज येथे कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार, आशा दयाराम वाघ यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल सादर करण्यात यावा, असा मजकूर या पत्रात आहे. तसेच आशा दयाराम वाघ यांनी 2004 सालीच मरण पावलेलेल्या व्यक्तीची बोगस प्रमाणपत्र वापरून, एमपीएससी आणि महसूल विभागाला फसवत असल्याची तक्रार मधुकर दयाराम वाघ यांनी थेट महसुल सचिव, महसूल उपायुक्त यांना केली होती. या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र या नंतर बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
बीडच्या केज तहसीलमध्ये महसूल - 2 मध्ये नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या व गेल्या दहा वर्षांपासून बीड जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या, आशा दयाराम वाघ यांचे मृत्युपत्र समोर आले आहे. मात्र, जिवंत नायब तहसीलदारांच मृत्युपत्र समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भात नायब तहसीलदार आशा वाघ यांना विचारले असता मृत्यु प्रमाणपत्र पाहिल्यानंतर मला धक्काच बसलाय. मी जिवंत असताना आणि शासनाचा पगार घेऊन नोकरी करत असताना, अशा पद्धतीने मृत्यु प्रमाणपत्र शासकीय संस्था नगरपालिका कशी देऊ शकते? याचे आश्चर्य वाटत असल्याचे आशा म्हणाल्या.
आता मला जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागेल. तसेच नगरपालिकेसारख्या संस्थेने अशा पद्धतीने प्रमाणपत्र देणे चुकीचे आहे. यामुळे मला खूप मानसिक ताण होत आहे. असं नायब तहसीलदार आशा वाघ यांनी सांगितले. तर कौटुंबिक कलहातून सख्खा भाऊ असं करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. चाळीसगाव नगरपालिकेत माझ्यासारख्या नायब तहसीलदार पदावर काम करणाऱ्या अधिकार्याचे जिवंत असताना मृत्यू प्रमाणपत्र तयार केले जात असेल, त्या ठिकाणी इतर किती व्यक्तींचे मृत्यु प्रमाणपत्र तयार केले गेले असतील? जन्म आणि मृत्यूची नोंद घेताना कागदपत्रांची पडताळणी केली जाते का? हे मी आता पाहणार आहे. यासंदर्भात तक्रार देखील करणार आहे. मात्र, आता माझ्यासमोर मी हयात असल्याचे प्रमाणपत्र देण्याचा, खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. असं आशा वाघ यांनी सांगितलं.