हिमायतनगर| महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या राज्य शासन व नगरपालिका प्रशासन संचालनालय स्तरावरील विविध प्रलंबित न्याय मागण्या करिता शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
या मागण्यांबाबतचा पाठपुरावा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने वेळोवेळी करूनही नगरपालिका व नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन गंभीर नाही. त्यानुसार राज्य संघटनेने शासनास दिलेल्या नोटीस नुसार पुढीलप्रमाणे आंदोलन आहे. दि.05 एप्रिल 2022 रोजी राज्यातील सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून नगरपालिका व नगरपंचायत समोर निदर्शने करतील.
दि.20 एप्रिल 2022 रोजी आझाद मैदान ते मंत्रालयावर मोर्चा निघेल. यामध्ये राज्यातील सर्व कर्मचारी उपस्थित राहतील. दि.01 मे 2022 पासून ध्वजारोहण आटोपल्यानंतर राज्यातील सर्व कर्मचारी आवश्यक सेवेसह बेमुदत संपावर जातील. वरीलप्रमाणे आंदोलनाचे निवेदन संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी शामकांत जाधव, प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसिलदार डी.एन.गायकवाड व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले असून, या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज दि.05 एप्रिल 2022 रोजी हिमायतनगर नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने केली.
या आंदोलनामध्ये राज्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथजी घुगे, प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल, सरचिटणीस रामेश्वर वाघमारे, जिल्हाध्यक्ष बलभीम शेंडगे, राज्य संघटक सतीश देशमुख, वैजनाथ स्वामी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी माळचापुरे, जिल्हा कोषाध्यक्ष विठ्ठल शिंदे, स्थानिक अध्यक्ष बालाजी हरडपकर, कार्यालय अधीक्षक चंद्रशेखर महाजन, रत्नाकर डावरे, रफिक अहेमद, रमाकांत बाच्छे, मारोतराव हेंद्रे, शेख महेबूब, संदीप उमरे, शेख यासीन, राहुल सर्जेराव, श्याम पाटील, शेख मोजमिल, रामदास हेंद्रे, शेख रबानी, शेख मुख्तार यांच्यासह पाणीपुरवठा, विद्युत व स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी सहभागी आहेत.