नांदेड| निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार महत्वाचा आहे. फास्ट फुडपेक्षा नेहमी संतुलित आणि पोष्टीक आहार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन असा डॉ. अर्चना बजाज यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने उत्सव स्त्री जाणीवांचा हा सप्ताह घेण्यात येत असून शनिवार दिनांक 5 मार्च रोजी तिची अनवट वाट या महिला कट्टा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शिक्षण विस्तार अधिकारी सुचिता खल्लाळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
पुढे त्या म्हणाल्या, उठल्या बरोबर आपण चहा घेतो, तो शरीरासाठी घातक आहे, ते टाळावे. वेळ नाही म्हणून जेवनाकडे दूर्लक्ष करु नये. दुपारच्या डब्यात हलका तसेच पोषक आहार नियमित घ्यायला हवा. जेवनात विविध पालेभाज्यांचा समावेश करण्याचेही त्यांनी आवाहन केले.
या संवादात त्यांनी वैद्यकिय क्षेत्रातून सामाजिक कार्य व अनुभव कथन केले. जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने कर्णबधिर व दृष्टी दोष निवारण मोहीम सुरु करण्यात आल्याचे सांगितले. घरात मुलांवर योग्य संस्कार रुजवताना मोबाईल व टीव्ही पाहण्यावर पालकांनी निर्बंध ठेवावेत. वाचन संस्कृती रुजवावी असेही त्या म्हणाल्या. या संवादात डॉ.अर्चना बजाज यांनी एड्सग्रस्त रुग्णांचे मानसिक पुनर्वसन, मतिमंद मुलांसाठी वसतिगृह, वैवाहिक जीवनात येणा-या अडचणीसाठी जीवनसाथी उपक्रतातून समुपदेशन, सुनो फाऊंडेशनच्या वतीने नवजात शिशुतील बहिरेपणा ओळखणे, तपासणी व निदान आदी आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील केलेल्या कामांची माहिती सांगितली.
प्रारंभी उप शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी डॉ. अर्चना बजाज यांचा परिचय करुन दिला. यावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, संतोष केंद्रे, त्रिवेणी झाडे, जयश्री देशमुख, शेख रुस्तुम, शिवदर्शन लांडगे आदींची उपस्थिती होती.