नांदेड| आज तीन दशकांपासून प्रा. नारायण शिंदे व त्यांचे सहकारी शेतकरी आणि साहित्यिक यांच्यातील मेहनती व गुणवंतांची पारख करून दरवर्षी पुरस्कार प्रदान करून गौरव करतात. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या शेतकऱ्यांचाही हा गौरव म्हणजे मोठी समाजसेवा होय. हे कार्य खरेच गौरवास्पद आहे. असे उद्गार शेतकरी संघटनेचे माजी नांदेड जिल्हाध्यक्ष राम कोंढेकर यांनी काढले.
दि. १२ मार्च रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण विचारमंचतर्फे नांदेड येथे शेतकरी व साहित्यिकांना पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष रामरावजी कोंढेकर हे होते व प्रमुख अतिथी म्हणून ह. सं. खंडगावकर हे होते. तर पुरस्कार सत्कारमूर्ती म्हणून प्रा. व्यंकटी पावडे, प्रा. शंकर विभुते, शंकर बोईनवाड, दिगंबर रेडेवाड, राम शिंदे, शिवाजी माळकौठेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रारंभी या मंचचे अध्यक्ष प्रा. नारायण शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी हे कार्य करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रा. व्यंकटी पावडे यांना स्वा. सैनिक कै. ह. भ. प. एकनाराव पा. शिन्दे पुरस्कार, दिगंबर रेडेवाड यांना कै. ह. भ. प. संभाजीराव पा. शिन्दे पुरस्कार, शिवाजी माळकौठकर यांना कै. सारजाबाई एकनाराव पाटील पुरस्कार, राम शिन्दे यांना कै. कोंड्याबाई एकनाराव पाटील पुरस्कार, शंकर बोईनवाड यांना कै. शेरसिघं कामठेकर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सर्व पुरस्कार विजेत्यांचा उपरणे, ग्रंथ, सन्मानचिन्ह व पुष्पहाराने सन्मान करण्यात आला.
यावेळी कथाकार दिगंबर गं. कदम यांनीही पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला. यावेळी प्रा. व्यंकटी पावडे यांनी माझ्या लेखन जबाबदारीत वाढ करणारा हा पुरस्कार असल्याचे म्हटले तर प्रा. शंकर विभुते यांनी आपण दिलेला पुरस्कार मला नेहमी प्रेरणा देत राहील व फुलांचा गंध माझ्या जीवनात दरवळत राहील असे म्हटले. यावेळी शिवाजीराव माळकौठेकर, राम शिंदे, दिगंबर रेडेवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ह. सं. खंडगावकर यांनी आपल्या भाषणात प्रा. नारायण शिंदे यांच्या संस्कारक्षम, धाडसी व्यक्तिमत्त्वाबद्दल गौरवोद्गार काढले व त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनीही या उपक्रमाबद्दल आपल्या भाषणातून आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन पंडित पाटील यांनी केले तर आभार प्रा. अनमोलसिंग कामठेकर यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा. गोपाळराव देशमुख, शिवाजीराव कपाळे, प्रा. जगदीश कदम, प्रा. भगवान अंजनीकर, निर्मलकुमार सूर्यवंशी, प्राचार्य डावळे, भा. ग. मोरे, आनंद पुपलवाड, आनंद गंगातीर, भास्कर शिंदे, विजयकुमार चित्तरवाड, प्रा. वडजे, प्रा. विभुते, अॅड भोसले, राऊतखेडकर, राम कोरे, गंगाधरराव तिडके, जेजेराव तिडके, दिगंबर कानोले आदीउपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दता डांगे..भास्करबुवा शिन्दे, विजयकुमार चितरवाड, रामेश्वर शिन्दे, माधव शिन्दे, ज्ञानेश्वर शिन्दे, बालाजी ब्रम्हाजी शिन्दे, बाळू शिन्दे यांनी सहकार्य केले.