नांदेड| मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी नवामोंढा भागातील विद्युत भवन कार्यालयासमोर द्वारसभा घेवून हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
महावितरण कंपनीचे खासगीकरण करण्यात येवू नये, मयत कर्मचार्यांच्या वारसांना तातडीने सेवेत कायमस्वरुपी घेण्यात यावे, मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्यात यावा, डिप्लोमा अभियंत्यांना न्याय मिळावा, तंत्रज्ञ कर्मचार्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला देण्यात यावा, यंत्रचालक कर्मचार्यांच्या वेतन श्रेणीतील तफावत दूर करावी व अन्य मागण्यांसाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने दि.2 मार्च रोजी राज्यात द्वारसभा घेवून आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. नवामोंढा येथील विद्युत भवन कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली. संघटनेच्या हल्लाबोल आंदोलनाने कार्यालयाचा परिसर दणाणुन गेला होता.
मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष सिध्दार्थ पाटील, परिमंडळ अध्यक्ष शंकर घुले, संघटनेचे पारेषण परिमंडळ अध्यक्ष अभयराज कदम, सूर्यकांत गोणारकर यांचे यावेळी समयोचित भाषणे झाली. या आंदोलनात प्रमोद बुक्कावार, विनायक ढवळे, सदानंद कांबळे, विवेक लांडगे, किरण माने, राजू कांबळे, अविनाश खंदारे, के.एस. कांबळे, दीपक टोम्पे, राजेश समुद्रे, सौ.सुरेखा लोणे, बी.जी.सोनकांबळे, संतराम टोम्पे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.