नाट्य स्पर्धेत “कधी उलट कधी सुलट” ने वाढवली रंगत -NNL


नांदेड|
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत एका पेक्षा एक सरस नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होत आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी “कधी उलट कधी सुलट’ या अभिजित वाईकर लिखित, सोनाली डोंगरे दिग्दर्शित नाटकाचे सादरीकरण झाले.

छत्रपती सेवाभावी संस्था उखळी, जी. परभणीच्या वतीने सादर झालेले हे  नाटक प्रेक्षकांना हसवत हसवत माणसाचे दिवस व वेळ कसा बदलत जातो, होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते कसे होते हे या नाटकातून पहावयास मिळाले. यात दिनेश कदम यांनी साकारलेली पेंडसे अप्पाची भूमिका उत्तम साकारली तर सोनाली डोंगरे, प्रियदर्शनी गुनाले, बाळकृष्ण कुलकर्णी, दिपाली कुलकर्णी, प्रदीप लेंडवे, सात्ताप्पा राणे, मीनानाथ खाटिक, सम्यक गायकवाड, प्रसाद निर्मळे, महेश होनमाने यांनी आप आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

या नाटकाचे नेपथ्य शेख अकबर बागवान आणि यशवंत पवार यांनी साकारले, तर रंगभूषा पूनम पुजारी, संगीत- स्वराज्य भोसले, प्रकाशयोजना – संतोष कापावार आणि प्रशांत पांडे यांनी आशयानुरूप साकारण्याचे प्रयत्न केले. तर सह दिग्दर्शन प्रियदर्शनी गुनाले यांनी केले. स्पर्धेचा तिसरा दिवसही नांदेडकर रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला. रोज नव नवीन विषय, आशय असलेले नाट्य प्रयोग पाहता येत असल्याचे समाधान रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. पुढेही एका पेक्षा एक सरस नाट्य प्रयोग सादर होणार असल्याचे नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी सांगितले आहे.

उद्या दि. ४ मार्च रोजी क्रांती हुतात्मा चॅरीटेबल ट्रस्ट, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, सुनिता करभाजन दिग्दर्शित “भयरात्र” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी