नांदेड| लोकवाङ्मय गृह मुंबई आणिमराठवाडा साहित्य परिषद, नांदेडच्या वतीने प्रा.महेश मोरे लिखित 'बोऱ्याची गाठ' या कादंबरीचे प्रकाशन साहित्यिक आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मंगळवारी 29 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहातील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील राहणार असून कादंबरीचे प्रकाशन संत गाडगे महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लोहाचे प्राचार्य डॉ. अशोक गवते पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, नरहर कुरुंदकर पुरस्कार प्राप्त साहित्यिक देवीदास फुलारी, यशवंत महाविद्यालयाचे प्रा.डॉ. शंकर विभुते यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ पृथ्वीराज तौर करणार असून कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मसापच्या नांदेड शाखेचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, लोकवाङ्मय गृह मुंबईचे राजन बावडेकर, मसापचे उपाध्यक्ष दिगंबर कदम, कोषाध्यक्ष निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे. 'गावपांढरी' या कादंबरीनंतर प्राध्यापक महेश मोरे यांची तब्बल बारा वर्षानंतर 'बोऱ्याची गाठ' ही कादंबरी येत असल्याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.