नांदेड| महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावर एकापेक्षा एक सरस नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले. स्पर्धेच्या तेराव्या दिवशी तन्मय ग्रुप नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित "२८ युगांपासून मी एकटी" या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले.
स्त्रीला स्वतःतील माणूस पण सिद्ध करण्याचा प्रयत्न २८ युगांची पासून सुरू आहे. हे मांडताना लेखकाने मानवी मन, त्यातील वृत्ती-प्रवृत्ती कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध याचे मार्मिकपण जिव्हारी लावणारे दर्शवले आहे. लेखक कौटुंबिक गोष्ट सांगताना पोलीस यंत्रणा, न्याय व्यवस्था, प्रसार माध्यम यांच्या फोलपणावरही टोकदार भाष्य करतो. समाजात होणाऱ्या मोबाईल आणि नेट च्या अतिरेक वापरामुळे समाजावर होणारा परिणामही प्रभावीपणे मांडतो.
या नाटकात कल्याणी ची भूमिका साकारणारे नीलिमा चितळे आणि गिताची भूमिका साकारणारे शुभांगी वाणी यांनी आप आपल्या पात्राला योग्य न्याय दिला तर नाथा चितळे, सायली जोशी, स्नेहलता जाधव, विश्वास आंबेकर, अपर्णा चितळे, संजय पाटील देवळानकर यांनी आशयानुरूप भूमिका साकारली. यातील सारंग देशपांडे, सुमित नाईक,भीमाशंकर निळेकर, श्रीरंग राजूरकर, सुनील कौठेकर, किरण कऱ्हाड, अंताजी जाधव, महेश सुक्रे यांनीही भूमिका साकारली.
प्रणव चौसाळकर आणि श्रीरंग राजूरकर यांनी साकारलेले या नाटकाचे नेपथ्य सूचक, आशयानुरूप होते. तर अमोल काळे आणि शेख शफीक यांची प्रकाशयोजना, श्रद्धा वाकडे यांचे पार्श्वसंगीत नाटकाची उंची वाढवते. या नाटकाची रंगभूषा तेजस्विनी देलमाडे आणि वेशभूषा नेहा चितळे यांनी साकारली.