माहिती देण्याचे सोडून उलट विस्तृत माहिती आहे असे कारण दाखवून अर्ज निकाली काढले
हिमायतनगर| भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करण्यासाठी माहिती अधिकाराचे अस्त्र वापरले जात असून, माहिती मागण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला आहे. अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती देणे अनिवार्य असतानाही हिमायतनगर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत माहिती देण्याचे सोडून अन्य कारण दाखवून थेट अर्जदाराचा अर्ज निकाली काढण्याचा प्रताप हिमायतनगरच्या तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने केला आहे. हि एक प्रकारे माहिती अधिकाराची अवहेलना असल्याचा आरोप मजदूर पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष शुद्धोधन हनवते यांनी केला आहे. अश्या प्रकार माहिती देण्यास टाळाटाळ करून आपले पितळे उघडे पडू नये याची पुरेपूर दक्षता संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसह कंत्राटी कर्मचारी घेत असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात गेल्या काही दिवसापासून मनमानी कारभार सुरू आहे. शासनाच्या आलेल्या अनेक योजनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा प्रकार गेल्या तीन महिन्यापासून तालुक्यात गरोदर माता व बालकाच्या तपासणी शिबिर झाले नसल्याच्या कारणावरून समोर आला आहे. असे अनेक योजनात गेल्या काही वर्षांपासून सावळा गोंधळाचे प्रकार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळण्यासाठी मजदूर पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष शुद्धोधन हनवते यांनी माहिती अधिकाराचा वापर करत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात शासनाकडून मिळणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सत्यप्रत देण्यात यावि अशी मागणी केली होती.
खरे पाहता जण माहिती अधिकारातून मागविण्यात आलेल्या माहितीचा तपशील संबंधित विभागाने ३० दिवसात देणे बंधनकारक आहे. असे असताना देखील ३० दिवस होण्यापूर्वी माहिती अधिकार कायदयाच्या कचाट्यात अडकू नये याची पुरेपूर काळजी घेत १२ दिवसातच अर्ज निकाली काढण्यात आला आहे. अर्ज निकाली काढताना उलट जनमाहिती अधिकारी तालुका आरोग्य कार्यालय हिमायतनगर यांनी आरोग्य विभागात प्राथमिक आरोग्य केंद्र विविध योजना राबविल्या जातात आपणास कोणत्या योजनेची माहिती अपेक्षित आहे ते स्पष्टपणे कळवावे. असे नमूद करून आरोग्य विभागाच्या संबंधित कार्यालयात कार्यरत असलेल्या मानव विकास मिशन अंतर्गतच्या कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांनी अकलेचे तारे तोडले आहे. एवढेच नाहीतर सदर माहिती अधिकाराचा अर्ज निकाली काढला आहे. अर्ज निकाली काढताना तक्रारकर्त्यानी अर्जात व्यक्तिशा माहिती देण्याचे नमूद केल्यानंतरही अर्ज निकाली काढल्याचे पत्र पोस्टाद्वारे पाठविले.
हे पञ मिळाल्यानंतर माहिती न देता अर्ज निकाली कसा..? काढला अशी विचारणा करण्यासाठी दि २५/१०/२०२१ रोजी अर्जदार गेले असता डॉ.संदेश पोहरे हे कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली होत असलेल्या कामकाजात सावळागोंधळ असल्याचे स्पष्ठ जाणवत आहे. हा प्रकार उघड होऊ नये या उद्देशाने सदर माहितीचा अर्ज निकाली काढण्याचा प्रयत्न केला. यावरून माहिती अधिकाराची खिल्ली उडविल्याचे दिसत असून, तालुका आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.