मुखेड शहरात चालतो म्हणे बनावट नोटरीचा व्यवसाय

नांदेड (एनएनएल) मुखेड शहरात एक मुद्रांक विक्रेता हा आपल्या वकील भावाच्या नावावर नोटरी कागदांवर खोट्या स्वाक्षऱ्या करीत असल्याची तक्रार अखिल भारतीय सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी जोगदंड
यांनी जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडे केली आहे.

बालाजी जोगदंड यांनी दिलेल्या निवेदनात असे नमुद केले आहे की, मुखेड येथे तहसील कार्यालयात राजू बापूराव इंगोले हे मुद्रांक विक्रेता आहे. त्यांचे भाऊ ऍड.शिवाजी बापूराव इंगोले हे पब्लिक नोटरी नायगाव आहेत. राजू इंगोले हे मुखेड येथील स्थानिक वकील ऍड.रवी एकलारे आणि इतर चार-पाच मुद्रांक विक्रेते आणि दलाल असे मिळून ऍड.एस.डी.इंगोले यांच्या नोटरीचे शिक्के वापरुन त्यावर त्यांची खोटी स्वाक्षरी मारत आहेत. त्यामुळे जनतेची आणि शासनाची दिशाभूल करुन हे लोक अवैध मार्गाने पैसे कमविण्याचा व्यवसाय करीत आहेत.  राजू इंगोले हे मुद्रांक विक्रेते असताना त्यांनी ऍड.एस.बी.इंगोले हा आपल्या भावाच्या नावाचा बोर्ड टेबलवर ठेवून विविध प्रकारची शपथपत्रे, करारनामे व इतर कागदांना नोटरी करुन देत आहेत. त्यात राजू इंगोलेला डॉ.रवी एकलारे आणि इतर दलाल मदत करतात. हा तोतया राजू इंगोले नावाचा तोतया नोटरी फक्त बारावी पास असून, नोटरीच्या नियमांची काहीच माहिती नसताना तो सर्रास खोटे कागदपत्रे तयार करुन देतो. याबाबत पोलीस अधीक्षकांनी छुप्या कॅमेऱ्याने व्हिडीओ चित्रीकरण करुन मुखेड येथे चालू असलेला हा बनावटपणा थांबवावा, अशी विनंती बालाजी जोगदंड यांनी निवेदनात केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी