मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बडतर्फ पोलिसाला 5 दिवसांची पोलीस कोठडी

नांदेड (एनएनएल) जून महिन्यात मारामारी करुन एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातून बडतर्फ झालेल्या एका पोलिसाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.व्ही.सिरसाट यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

16 जून 2017 रोजी कुलभूषण टिप्परसे रा.सिडको यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना आणि त्यांचा भाऊ सुदर्शन टिप्परसेला बळी इंगेवाडसह सहा जणांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत सुदर्शन टिपरसेला फ्रॅक्चर झाले आहे. त्या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी सात जणांविरुध्द भारतीय दंड विधानाची कलमे 307 सह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याअगोदर सहा लोकांना पकडले आहे, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील सातवा आरोपी सुधाकर लक्ष्मणराव इंगेवाड (32) यास  पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांच्या मार्गदर्शनात नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडले. सुधाकर इंगेवाड हा अगोदर बीड जिल्ह्यात पोलीस होता. तेथे त्याच्याविरुध्द बलात्कार आणि विनयभंग असे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे बीड पोलिसांनी त्यास सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती सांगण्यात आली. आज पोलीस उपनिरीक्षक बी.बी.पवार, पोलीस कर्मचारी बालाजी लाडेकर, अंकुश पवार यांनी बडतर्फ पोलीस सुधाकर इंगेवाडला न्यायालयात हजर केले. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असते हा मुद्दा सरकारी वकील ऍड. मोहंमद रजियोद्दीन यांनी मांडला. न्यायाधीश सिरसाट यांनी सुधाकर इंगेवाडला पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी