नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने विद्यापीठाच्याविकासासाठी जेवढे काही प्रस्ताव महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे पाठविलेले आहेत ते सर्व प्रस्ताव मी स्वतः लक्ष घालून पास करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विद्यापीठ हे नांदेडचे वैभव आहे. त्याच्या विकासासाठी मी सदैव तयार आहे. असे मत नांदेडचे खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले.
ते आज रविवार दि. ११डिसेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेच्या उद्घाटनपर मार्गदर्शन करतांना बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्रमुख पाहुणे शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित मा. अंकुश पाटील, प्र-कुलसचिव व्यंकट रामतीर्थे, क्रीडा विभगाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित मा. अंकुश पाटील आपले मत व्यक्त करताना म्हणाले, कोणत्याही खेळामध्ये कौशल्य आणि शारीरिक शक्ती शिवाय यश शक्य नाही. त्यातल्या त्यात व्हॉलीबॉल मध्ये सहाही खेळाडूंना नेहमी सावध राहावे लागते. क्षणाक्षणाला स्वतःची जागा बदलावी लागते. कधी सेंटर, कधी ब्लॉकर तर कधी हिटर असे अनेक रोल प्रत्येक खेळाडूंना निभवावे लागतात. प्रगत राष्ट्रातील तंत्रज्ञान आपल्याकडे दहा वर्षे उशिराने अवगत होते. त्यामुळे आपला संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू शकत नाही. शेवटी त्यांनी सर्व खेळाडूंना एक कानमंत्र दिला.‘ प्ले फॉर विन ’ म्हणजे जिंकण्यासाठी खेळा ही जिद्द जोपर्यंत खेळाडूंच्या मनात तयार होणार नाही. तोपर्यंत चांगले खेळाडू तयार होणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंनी हा कानमंत्र घेऊन खेळावे आणि जिंकावे अशी अशा त्यांनी यावेळी व्यक्ती केली.
अध्यक्षीय सामारोपामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, या विद्यापीठानी खेळाला नेहमीच महत्त्व दिलेले आहे. राष्ट्रीय स्तरावर या विद्यापीठाचे खेळाडू चमकले आहेत. खेळामध्ये परिश्रम, जिद्द आणि समर्पित भावना हेच यशाचे मंत्र आहे. जिंकण्यासाठी खेळा म्हणजेच यश निश्चित आहे असेही ते यावेळी म्हणाले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज आणि क्रीडा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर मशाल पेटवण्यात आली आणि उपस्थित संघाद्वारे मान्यवरांना सलामी देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. दिलीप भडके यांनी केले तरआभार प्रदर्शन प्रा. डॉ. व्यंकट माने यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कालपासून स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत सुरु असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धा २०२२ च्या दुसऱ्या दिवशी आज स. ९:०० वा. पासून ते दुपारपर्यंत चार विविध व्हॉलीबॉल मैदानावर एकूण ३२ सामने खेळण्यात आले.
यामध्ये राज्यस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यातील विविध संघांनी आपल्या खेळांचे कौशल्य दाखविले. विद्यापीठात दिवस-रात्र (प्रकाश झोतात) चालणारे हे सामने बघण्याकरिता आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता मोठ्या प्रमाणावर परिसरातील खेळ प्रेमी येत आहेत. आज सकाळच्या सत्रात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी मैदानवर जावून खेळाडूंची भेट घेवून त्यांना प्रोत्साहित केले.
पहिल्या सत्रातील सामन्यात जिवाजी विद्यापीठ (ग्वालियर), आयआयटी (गांधीनगर), बरकतउल्हा विद्यापीठ (भोपाळ), रवींद्रनाथ टोगोर विद्यापीठ (भोपाळ), आरएसएस विद्यापीठ (चिंदवाडा), एमसीबीयू (छतरपूर), गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली विद्यापीठ, नवसारी कृषी विद्यापीठ, मेवाड विद्यापीठ (चीतौडगड) विद्यापीठ आदी संघ ग्रुप ए मधून विजयी झाले आहेत. ग्रुप बी मधून कुशलदेर विद्यापीठ, हनमानगडी विद्यापीठ, इंदोर विद्यापीठ, एमआयटी पुणे विद्यापीठ, आयटीएम ग्वालियर विद्यापीठ, विवेकानंद जयपूर विद्यापीठ, बंसेवाडा विद्यापीठ, गोवा विद्यापीठ, आरडीव्हीव्ही जबलपूर विद्यापीठ, एसआरटीएम विद्यापीठ नांदेड हे संघ अत्यंत चुरसीच्या सामन्यात विजयी झाले.
सी ग्रुपमधून गुजरात विद्यापीठ (अहमदाबाद) आणि एचएजीएन विद्यापीठ (पाटन) या संघांनी आपला विजय नोंदविला. या नंतर झालेल्या डी ग्रुप मधील सामन्यात संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर, केंद्रीय विद्यापीठ अजमेर, सरदार पटेल विद्यापीठ (आनंद), एसजीजीएस विद्यापीठ (गांधीनगर), एचएसजी विद्यापीठ (सागर), एमएसजी विद्यापीठ (बडोदा), एसपीपी पुणे, मुंबई विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ अहमदाबाद आदींनी आपल्या कौशल्याच्या आधारावर विजय खेचून आणला.