नांदेड जिल्ह्यात आज पासून ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान -NNL


नांदेड|
केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलजीवन मिशनच्या माध्यमातून स्वच्छ व शाश्वत पिण्याचे पाणी नागरिकांना नियमित व्हावे या उद्देशाने 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत राज्यभरात ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद नांदेडच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.     

दूषित पाण्यामुळे विविध जलजन्य आजार पसरू शकतात त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखणे ही सर्व ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांनी दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत राज्यभरात स्वच्छ जल से सुरक्षा हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकुण 11290 पिण्याच्या पाण्याचे श्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार असून त्याचे रिपोर्ट शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात असलेल्या सर्व स्त्रोतांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे.    

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व गावातील प्रत्येकी पाच महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पिण्याच्या पाणी नमुन्यांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता लागणारे जैविक पाणी तपासणी किट ग्रामपंचायत स्तरावर वितरित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या सोर्स वर्षातून एक वेळा रासायनिक तपासणी वृक्षाच्या माध्यमातून करण्यात येते. या अभियान कालावधीत गावागावातील पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी रसायनिक फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून गावातच करण्यात येणार आहे. 

ग्रामपंचायतीने निवड करण्यात आलेल्या या पाच महिलांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखली जाणार आहे. यासाठी तालुकानिहाय प्रशिक्षण देण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली असून या महिलांना रासायनिक पाणी नमुने तपासणी किटची माहिती देण्यात येणार आहे. या किटच्या माध्यमातून गावातील सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांची क्लोराईड, लोहगडुळपणा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पीच, एकूण क्षारता, एकूण कठीणपणा, फ्लोराईड, नायट्रेट, आदी घटकांची तपासणी करण्यात येणार आहे.        

जिल्ह्यातील नागरीकांची आरोग्य व स्वच्छता विषयक जागरक असल्याने जलजन्य आजाराचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. ग्रामपंचायत निहाय प्रशिक्षण करण्यात येणाऱ्या महिलांनी आपल्या गावातील पाण्याच्या स्वतःचे रासायनिक फिल्ड किटच्या माध्यमातून तपासणी करून 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, सामान्य व पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन-जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ यांनी केले आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी