किनवट, माधव सूर्यवंशी। जमिनीच्या वादातून संतोष कोल्हे, शाल कोल्हे व विक्की कोल्हेंनी बंडू कंचर्लावार आणि श्रीकांत कंचर्लावार यांच्यावर केलेल्या भ्याड तथा प्राणघातक हल्या प्रकरणी किनवट पोलीसात गुन्ह्याच्या नोंदी केल्या खर्या मात्र हल्लेखोर अद्यापही ताब्यात नाहीत. हीच मागणी घेऊन आज आर्यवैश्य समाज संघटनेच्या वतीने कांहीवेळ मार्केट बंद ठेऊन अटक करण्यासाठी पोलीसांना निवेदनही दिले आहे. यापुढे पोलीसांची तपासाची चक्रे किती गतीमान होतील यावर सर्वकांही अवलंबून असणार आहे.
१२ डिसेंंबर रोजी श्रीकांत भुमन्ना कंचर्लावार व बंडू भुमन्ना कंचर्लावारांवर उक्त तिघांनी लाठ्या-काठ्यांनी व दगडाने बेदम मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी हैदराबादच्या यशोदा हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
रमेश नेम्मानिवारांच्या फिर्यादीवरुन संतोष कोल्हे, विशाल कोल्हे व विक्की कोल्हे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ गुन्ह्याच्या नोंदी करण्यात आल्या. अद्यापही हल्लेखोर पोलीसांच्या ताब्यात आले नसल्याने आज (१४ डिसेंबर) सकाळी आर्यवैश्य समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनकर चाडावारांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने पोलीसांना निवेदन दिले असल्याचे प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.