तुळजापूरसाठी 'ब्रॉडगेज' , माहूरसाठी कधी ? -NNL


महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन पिठांपैकी तुळजापूरची भवानी माता तसेच माहूरची रेणुकामाता भारतात प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद व नांदेड या दोन्ही जिल्ह्यातील या प्रसिद्ध देवींच्या दर्शनासाठी रेल्वेमार्ग होणे गरजेचे आहे. तुळजापूर व माहूर येथे देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून तसेच शेजारच्या राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. या भाविकांना रेल्वेची जलद सुविधा प्राप्त व्हावी यासाठी नियोजन करून प्रकल्प आखणे महत्त्वाचे आहे. 

सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद हा रेल्वेमार्ग 'ब्रॉडगेज’ करण्याचा निर्णय काही दिवसापूर्वी झाला. या प्रकल्पासाठी एकूण ९०४ कोटी ९२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्या प्रकल्पाच्या खर्चापैकी ५० टक्के रकमेचा सहभाग म्हणून ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. या निर्णयामुळे येत्या चार वर्षात ब्रॉडगेज रेल्वे मार्ग पूर्णत्वास जाईल असे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले . उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी काही वर्षानंतर का होईना भाविकांना रेल्वेने प्रवास करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापूर रेल्वेमार्ग करणार अशी घोषणा केली होती . हा रेल्वे मार्ग झाल्यास पर्यटन विकासासह अन्य विकासाला मदत होणार आहे. मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. 

 ८४ किलोमीटरच्या मार्गासाठी लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि शासनाच्या जमिनीचा भूसंपादनाचा अंतिम अहवाल देखील सोलापूर जिल्हाधिकारी  कार्यालय आणि उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर करण्यात आला आहे. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या नवीन रेल्वे ब्रॉडगेज मार्गासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. कुठलाही प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींचा आग्रह स्थानिक जनतेची मागणी तसेच राज्य शासन व केंद्र शासनाची तयारी महत्त्वाची मानली जाते. तुळजापूरच्या बाबतीत उस्मानाबाद मधील लोकप्रतिनिधी व जनतेची मागणी पूर्णत्वास जात आहे. परंतु नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी रेल्वेची सुविधा व्हावी , अशी मागणी या जिल्ह्यातून एकाही लोकप्रतिनिधींनी केलेली नाही. 

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील या दोघांनी माहूर येथील रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो. मराठवाड्यातील दोन देवींचे शक्तिपीठ रेल्वेमार्गाने एकमेकांना जोडले गेल्यास भाविकांची खूप मोठी सोय होईल. मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारात प्रलंबित आहेत. त्या प्रलंबित रेल्वे प्रश्नांमध्ये हा एक प्रश्न देखील किमान जोडला जावा,  अशी रास्त अपेक्षा आहे. पंगतीमध्ये जेवायला बसल्यावर वाढपी आपला असेल तर पोटभर जेवायला मिळते, असे ग्रामीण भागात म्हटले जाते. मराठवाड्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपद योगायोगाने भेटलेले आहे . जालना येथील खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडून मराठवाड्यातील जनतेला खूप अपेक्षा आहेत . त्यामुळे त्यांच्या रूपाने मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न लवकर सुटावेत व सुटलेच पाहिजेत, अशी नागरिकांची धारणा आहे.

नांदेड जिल्ह्यातील माहूर ते किनवट हा रेल्वेमार्ग केल्यास विदर्भ- मराठवाडा तसेच तुळजापूरपर्यंत रेल्वे मार्ग जोडल्यास पश्चिम महाराष्ट्राशी हा मार्ग जोडला जाऊ शकतो. माहूरची रेणुकादेवी व तुळजापूरची भवानीमाता या दोन देवींच्या दर्शनासाठी भाविकांची सोय लक्षात घेऊन रेल्वेमार्गांची आखणी केल्यास महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील भाविकांची खूप मोठी सोय होईल. राज्य मंत्रिमंडळाने तुळजापूरसाठी ब्रॉडगेज करत असताना ५०% खर्च देण्याचा ज्याप्रमाणे निर्णय घेतला त्याप्रमाणे माहूरच्या रेणुकादेवी साठीही निर्णय घ्यावा, असे लाखो भाविकांना वाटते. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे ब्रॉडगेज मार्गाचे उद्घाटन करत असताना तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी माहूरच्या देवीला जोडणारा रेल्वे मार्ग करण्यात येईल , असे आश्वासन दिले होते.

 त्यावेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी हा मुद्दा २००७ मध्ये उपस्थित केला होता. त्यानंतर मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे सुधाकरराव डोईफोडे, ओमप्रकाश वर्मा यांनी देखील या रेल्वे मार्गाची मागणी लावून धरली होती. त्याबाबत त्यांनी केंद्र सरकारकडे तसेच रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा देखील केला होता.मराठवाड्यातील खासदारांनी ही दोन्ही शक्तीपीठे एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्न करावेत. तुळजापूरचा प्रश्न तरी तूर्त सुटल्यात जमा आहे. परंतु माहूरसाठी किमान नांदेड व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील खासदारांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढे यावे.

मराठवाड्यातील नांदेड रेल्वे डिव्हिजन अंतर्गत नांदेड तसेच कर्नाटकमधील बिदर या नवीन रेल्वे मार्गाचे २३० किलोमीटरचे काम लवकरच सुरू होणार आहे. यवतमाळ -वर्धा - नांदेड या २६० किलोमीटरचे काम मंजूर झाले असून ते सद्यस्थितीत सुरू आहे. परळी -बीड -अहमदनगर हे दोनशे दहा किलोमीटरचे काम सुरू असून हे काम अर्धे झाले आहे. केंद्रात रेल्वे राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे हे मराठवाड्याचे म्हणजेच जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी जातीने माहूरच्या रेल्वे मार्गाबाबत लक्ष घातल्यास हा खूप मोठा प्रश्न सुटू शकतो. मराठवाड्याची छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. भागवत कराड हे केंद्रात अर्थ राज्यमंत्री आहेत.

त्यांनी देखील मराठवाड्यातील या दोन्ही शक्तीपीठांना जोडणारा रेल्वेमार्ग आखणी करून पूर्ण केल्यास त्यांना महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही. सोलापूर- उस्मानाबाद मार्गामुळे मराठवाडा, दक्षिण भारत तसेच सोलापूरचा फायदा होईल नवीन रेल्वेगाड्या सुरू होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. तसेच दक्षिण भारतात जाण्यासाठी जवळचा व सुकर मार्ग देखील तुळजापूरच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे .व्यापारी, शेतकरी , विद्यार्थ्यांची व भाविकांची प्रवासाची सोय यामुळे पूर्ण होईल. तसेच तुळजापूर हे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. तुळजापूर प्रमाणे माहूरदेखील तीर्थक्षेत्र असल्याने रेल्वेच्या नकाशावर आल्यास हा वेगळाच आनंद भाविकांना होईल.

...अभयकुमार दांडगे, नांदेड, मराठवाडा वार्तापत्र

abhaydandage@gmail.com

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी