अजिंठा बुद्ध विहारात मार्गशीर्ष पौर्णिमा उत्साहात; काव्य पौर्णिमा, प्रश्न मंजुषा विविध उपक्रम संपन्न
नांदेड। बौद्ध विहारात धम्मप्रचार आणि प्रसाराचे कार्य चालते. तसेच ते धम्मसंस्काराचे प्रभावी केंद्र मानले जाते. त्याबरोबरच बौद्ध विहारांतून सर्वांसाठीच ज्ञानार्जनाची प्रक्रिया सुरू व्हावी अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास मंडळाचे सदस्य नागराज कांबळे यांनी व्यक्त केली. ते जूना कौठा भागातील अजिंठा बुद्ध विहारात मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, विचारांना चालना मिळणे हे या उपक्रमाचे एक उद्दिष्ट आहे. आंबेडकरी विचार आणि संशोधनासाठी अभ्यास मंडळाच्या आॅनलाईन प्रशिक्षण सत्रास उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अभ्यास मंडळाचे बसवंत नरवाडे, सामाजिक कार्यकर्ते धम्मभूषण सुभाष लोखंडे , ज्येष्ठ कवी थोरात बंधू, कवी प्रकाश ढवळे नागलगांवकर, काव्य पौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे आदींची उपस्थिती होती.
शहरातील जूना कौठा परिसरातील गोदेतटी असलेल्या अजिंठा बुद्ध विहारात मार्गशीर्ष पौर्णिमेचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या प्रतिमांचे दीप धूप आणि पुष्प पूजन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर अजिंठा बुद्ध विहार समितीकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सप्तरंगी साहित्य मंडळाची ६४ वी काव्य पौर्णिमा उत्साहात साजरी झाली.
यात ज्येष्ठ कवी थोरात बंधू, कवी प्रकाश ढवळे आणि प्रज्ञाधर ढवळे यांनी सहभाग नोंदवला. नागराज कांबळे आणि बसवंत नरवाडे यांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास मंडळाच्या वतीने महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच सुभाष लोखंडे यांनी यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन उत्तम भुक्तरे यांनी केले तर आभार बाबुराव भोकरे यांनी मानले. प्रश्न मंजुषेतील विजेता आदित्य लोणे या विद्यार्थ्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास मंडळाकडून पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिंबाजी भोकरे, सुनील भोकरे, अनुसया भोकरे, राजाबाई भोकरे, पुष्पा लोखंडे, रुपाली लोणे, सुरेखा भोकरे, कल्पना लोणे, भिमाबाई भोकरे, चंदा भुक्तरे, संध्या भुक्तरे यांच्यासह अजिंठा बुद्ध विहार समिती, महाप्रजापती महिला मंडळ, नवयुवक भीम जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जुना कौठा परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.