डीपीच्या मागणीसाठी कार्ला येथील शेतकरी पोचला विषारी औषधाचा डब्बा घेऊन महावितरण कार्यालयावर -NNL

ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार यांच्या मध्यस्तीने अनर्थ टळला

हिमायतनगर अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ५ दिवसात तीन गावचे शेतकरी महावितरणसमोर झाले होते आक्रमक  


हिमायतनगर, अनिल मादसवार|
तालुक्यातील मौजे कारला येथील शेतकरी गेल्या आठ दिवसापासून वीज पुरवठा खंडित असल्याने वैतागले आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या कार्ला पी शेतकरी महावितरण कार्यालयावर शुक्रवारी सकाळी धडकले. परंतु येथे एकही अधिकारी उपस्थित नसल्याने खंडू संभा कांबळे या शेतकऱ्याने चक्क विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येतात कारला येथील ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपिलवार यांनी उपस्थित होऊन मध्यस्ती करत टोकाची भूमिका घेण्यापासून शेतकऱ्यास थांबविले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ तूर्तास टळला असला तरी डीपी नाही मिळाल्यास शेतकरी कोणत्याही क्षणी आत्महत्येचे पाऊल उचलतील असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसते आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता व लाईनमन कर्मचारी यांच्या नाकर्तेपणा आणि मनमानी कारभारामुळे गेल्या महिन्याभरापासून सर्वसामान्य शेतकरी आणि वीज ग्राहक त्रासला गेला आहे. ऐन रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या विज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा अधिकाऱ्यांनी सुरू करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवीला आहे. एवढेच नाही तर नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना देखील सुरळीत विज पुरवठा दिला जात नाही. आता तर वीजबिले भरूनही शेती पंपांना वीज मिळत नाही, मिळाली तर कमी दाबाने मिळत असल्याने शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत. तर अनेक ठिकाणी डीपी भ्रष्ट होऊन आठ आठ दिवस शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा खंडित होतो आहे. याबाबतची सूचना देऊनही अधिकारी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी नागरिक महावितरण कार्यालवयावर येत आहेत. मात्र अधिकारी कार्यालयात दुपारपर्यंत उपस्थित राहत नसल्याने/समस्यांच्या निराकरण होत नसल्याने नाईलाजाने शेतकरी टोकाची भूमिका घेत आहेत.


असाच प्रकार दि.०९ रोजी सकाळी घडला असून, हिमायतनगर तालुक्यातील मौजे कार्ला पी येथील शेतकरी खंडू कांबळे, चंद्रकांत घोडगे, तुकाराम कदम, बालाजी कांबळे, उंदू कांबळे, गणेश नरवाडे, राहूल कांबळे, आणि इतर १० ते १५ शेतकरी आपली समस्या घेऊन महावितरण कार्यालयावर हजार झाले होते. मात्र १२ वाजले तरी अधिकारी कार्यालयात हजार नसल्याने पिके वाळू लागल्यामुळे त्रस्त झालेला शेतकरी खंडू संभा कांबळे याने चक्क विषारी औषध डब्बा सोबत आणून प्राशन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येतात गावाकडून हिमायतनगर शहरात येत असलेले कारला येथील ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपिलवार यांनी महावितरण कार्यालयाजवळ उपस्थित होऊन मध्यस्ती करत टोकाची भूमिका घेण्यापासून शेतकऱ्यास थांबविले आहे. 


तसेच त्यांनी तात्काळ हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर व हिंगोली लोकसभेचे खा हेमंत पाटील यांच्याशी बातचीत करून डीपी उपलब्ध करून देण्याचे मागणी केली आणि शेतकरी वीजपुरवठ्याअभावी टोकाची भूमिका घेत असल्याचे अवगत करून दिले आहे. याची दखल घेत लागलीच वरील दोन्ही नेत्यांनी महावितरणच्या संबंधितांना फोन लावून दोन दिवसात म्हणजे रविवारपर्यंत डीपी उपलब्ध करून द्या अशा सूचना दिल्या आहेत. नेत्यांच्या आश्वासनामुळे तात्पुरते कार्ला येथील शेतकऱ्यांनी आपला आक्रमक पवित्र मागे घेतला असला तरी डीपी मिळाली नाही तर पुन्हा महावितरण समोर येऊन आत्महत्या करू असा इशारा वीज पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे.


एकूणच हिमायतनगर येथील महावितरण कार्यालयाचा अनागोंदी कारभार समोर दिवसेंदिवस वाढतच चालला आला असून, या ४ दिवसात तीन गावच्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात रात्रीला व दिवस धडक देऊन वीजपुरवठ्याची समस्या तात्काळ सोडावा अशी मागणी केली असताना देखील महावितरणचे जबाबदार अधिकारी कर्मचारी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यात अपयशी होत असल्याचे दिसून येत आहे. नियमितपणे विजेची देयके भरणाऱ्या ग्राहकातुन महावितरण अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आतातरी हिमायतनगर येथे कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, काही लाईनमन कर्मचारी आपल्या कारभारात सुधारणा करून शेतकरी ग्राहकांना वीज बिल वसुलीच्या तत्परतेप्रमाणे सुरळीत वीज पुरवठा देऊन वेठीस धरण्याचे प्रकार थांबवीतलं का..? असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. 

आठ-आठ दिवस वीज पुरवठा मिळत नसले तर शेतकरी काय करणार -सोपान बोंपीलवार - विजेसाठी ट्रान्सफॉर्मर देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा महावितरण कार्यालयात विष प्राशन करण्याचा प्रयत्न झाला हि बाब खरी आहे. याबाबत नेत्यांना सांगितले, त्यांनी दोन दिवसात डीपी मिळे असे सूचित केले मात्र अद्याप मावतारांच्या एकही अधिकाऱ्यांनी आमच्याशी बातचीत केली नाही. त्यामुळे महावितरण कार्यालयातील भोंगळ कारभार उघड झाला आहे. अधिकाऱ्यांनी रब्बी हंगामाची गरज लक्ष घेता सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी तत्परता दाखविली असती तर शेतकरी आणि वीज ग्राहकावर हि वेळ आली नसती. आठ-आठ दिवस वीज पुरवठा मिळत नसले गावे अंधारात राहत असतील तर नागरिकांचा उद्रेक होणारच आहे. अशी प्रतिक्रिया कार्ला पी.येथील ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.


नियमितपणे विजेची देयके भरून ३ दिवस गाव अंधारात राहत असल्याने दिनांक ६ डिसेंबरच्या रात्री मौजे कोठा तांडा येथील वीजग्राहक रात्री नऊ वाजता महावितरण कार्यालयावर धडकले होते. यावेळी महावितरण विभागाच्या अभियंत्यांनी शांततेत समस्या सोडविण्याची मागणी करण्यासाठी नागरिकांना जेलमध्ये टाकण्याची भाषा वापरून हिटलरशाही कारभार केला. आणि वीजचोरी करणाऱ्या ठेकेदार व धनदांडग्यांना महावितरणचे अधिकारी अभय देतायंत का... असा आरोप गोरसेनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद राठोड यांनी केला आहे. तर दि.७ डिसेंबर रोजी एकंबा येथील शेतकरी शेती पंपास वीज पुरवठा सुरळीत द्या... अन्यथा फवारणीचे औषध (एंड्रील) पिऊन आत्मदहन करणार असा इशारा त्रस्त झालेला शेतकरी काशिनाथ लक्ष्मण बेले यांनी दिल्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांची भंभेरी उडाली होती. तर काल कार्ला पी येथील शेतकरी विषारी औषध प्रश्न करण्याच्या तयारीत होता. वीज समस्येमुळे होत असलेल्या अश्या गंभीर प्रकारानंतर तरी महावितरणचे अधिकारी हिमायत्तनगर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील वीज ग्राहक आणी शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा देऊन होऊ पाहणाऱ्या संभाव्य गंभीर स्वरूपाच्या घटना टाळतील का..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी