काळेश्वर येथील जलक्रीडा सुविधेचे प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी सादर करा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

विष्णुपुरी जलाशय परिसरात विकसित होणाऱ्या पर्यटन केंद्र व साहसी जलक्रीडा योजनेचा आढावा 


नांदेड, अनिल मादसवार|
नांदेड येथील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने विष्णुपुरी जलाशयात पर्यटन व साहसी व जलक्रीडा सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. नांदेड येथील श्री तख्त सचखंड हुजूर साहिब गुरूद्वाराच्या माध्यमातून व जिल्ह्यातील माहूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या निमित्ताने भाविक-पर्यटकांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील या शक्तीस्थळासमवेत विष्णुपुरी जलाशयातील साहसी जलक्रीडा सुविधा कामांचे तांत्रिक प्रस्ताव संबंधित यंत्रणेने त्वरीत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. 

त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले, नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) चे  कार्यकारी अभियंता आशिष चौगले व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत जलक्रीडा व्यवस्थापन समितीस लागणारी नाहरकत प्रमाणपत्र, तांत्रिक मान्यता, पाण्याची पातळी, सुरक्षितता याबाबत चर्चा करण्यात आली. विष्णुपुरी धरणात आजुबाजुच्या परिसराच्या पुनर्विकासासह बोटिंग क्लब आणि ॲडव्हेंचर पार्कचे प्रस्तावित बांधकाम, मल्टी ॲडव्हेंचर टॉवर आणि जायंट स्विंग स्थापित करणे, झिप लाइन, रोप कोर्स आणि मुलांच्या खेळाची उपकरणे, बोट क्लबसाठी विविध प्रकारच्या बोटी उपलब्ध करुन देणे आदी कामांचा यात समावेश आहे. यातील बोट क्लबसाठी विविध प्रकारच्या ज्या बोटी लागणार आहेत त्याची तांत्रिक मान्यता महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाकडून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी