नांदेड। नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक तथा कादंबरीकार डॉ. राम वाघमारे यांना अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा पुण्याचा साहित्यरत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळ गुरव पुणे येथे होणाऱ्या एका शानदार सोहळ्यात 10 डिसेंबर 2022 रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. डॉ. राम वाघमारे यांच्या 'फाईट फॉर द राईट' या बहुचर्चित कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. राम वाघमारे यांचे 'डोन्ट वरी सर' (कथासंग्रह) 'खेळ', 'ग्रॅपल', लढा', 'गुरुजींची शाळा', 'फाईट फॉर द राईट', इ. कादंबऱ्या व 'दीपस्तंभ' 'ऊर्जास्त्रोत;' 'आक्का'; 'कोहिनूर ए गझल इलाही' इ.चरित्रात्मक पुस्तके आणि 'काकांच्या शैक्षणिक गप्पा' (शैक्षणिक ) 'जखमांचे सुगंधी पण जपणारा इलाही' (संपादित) 'समकालीन कादंबरीकार भालचंद्र नेमाडे व रंगनाथ पठारे' (समीक्षाग्रंथ) इ. साहित्य संपदा प्रकाशित असून त्यांनी 'काळया' व 98% या शैक्षणिक लघु चित्रपटाची निर्मितीही केली आहे.
डॉ. वाघमारे हे श्री शारदाभवन संस्थेच्या महात्मा फुले हायस्कूल बाबानगर नांदेड येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. माजी जिल्हाधिकारी वर्धा ई. झेड खोब्रागडे, निवृत्त न्यायाधीश मुंबई हायकोर्ट बी. जी. कोळसे पाटील, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवडचे अंकुश शिंदे, आमदार बच्चू कडू, आमदार अण्णासाहेब बनसोडे, आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार डॉ. राम वाघमारे यांना देण्यात येणार आहे, असे श्री कैलास बनसोडे अध्यक्ष ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.