नांदेड| वाघाळा मनपाने शहरातील वजीराबाद भागातील जुनी हैद्राबाद बँक येथून पक्कीचाळ, देगावचाळ भागाकडे जाणाऱ्या रस्त्यास असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड असलेले नाव बदलून बाबांसाहेबांप्रती असलेल्या नितांत श्रद्धेचा अपमान केला आहे तसेच आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप आंदोलकांनी करीत बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी समाजाला स्वाक्षरी मोहीमेच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे नाव असलेल्या रस्त्याला समाजसेवक बाबुभाई ठक्कर मार्ग असे नामफलक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते १५ ऑक्टॉबर २०२२ रोजी लावले आहे. हे नामफलक लावत असताना नांदेड महापालिकेने चुकीच्या पद्धतीने ठराव करून, कायद्याने उल्लंघन करून हे नामफलक लावले आहे. या विरोधात २ नोव्हेंबर पासून महापालिका कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनास ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. प्रशासन दाखल घेत नाही, म्हणून आंबेडकर अनुयायांनीच आता दखल घेऊन, प्रशासनास जाब विचारण्याची वेळ आली आहे.
६ डिसें रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर, महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन ठिकाणी दुपारी १२ ते ४ या वेळात निवेदनावर स्वाक्षरी करून आंदोलनास पाठींबा देण्यासाठी मनपासमोर आंदोलनस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड बचाव कृती समितीचे भदंत पंय्याबोधी थेरो, रमेश सोनाळे, दिलीप जोंधळे, नंदकुमार खाडे, अनिल थोरात, श्याम निलंगेकर, संजय टिके, केशव थोरात, प्रकाश रायबोले, गयाबाई कोकरे, भिमाबाई हटकर, लक्ष्मीबाई नवघडे, संगिताबाई थोरात, गयाबाई हटकर, शिल्पा लोखंडे, लता वाघमारे, नागराबाई थोरात, शोभाबाई गोडबोले, गुजाबाई खाडे, विनोद वाघमारे, यशवंत थोरात, डॉ. रामचंद्र वनंजे, राहुल वाघमारे, रवी सोनकांबळे, राहुल चिखलीकर, संदीप मांजरमकर आदींनी केले आहे.