नांदेड| अखंडितपणे समाजसेवेसाठी नियोजनबद्ध काम करणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचे कार्य जगावेगळे असल्यामुळे खासदार चिखलीकर सह संपूर्ण चिखलीकर परिवार सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर यांनी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मायेची उब उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री रुग्णालय परिसरात झोपलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ब्लॅंकेट वाटप करताना केले.
विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नांदेड जिल्ह्यातील रुग्ण येत असतात. त्यांच्या नातेवाईकांना लॉज मध्ये झोपणे परवडत नसल्यामुळे ते मैदानातच झोपतात. अशा गरजूंना भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णाच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून ब्लॅंकेट पुरवले जातात. सोमवारी रात्री सुरुवातीला माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांनी प्रणिताताईंचा सत्कार केला. त्यानंतर शंभर ब्लॅंकेट देणारे ॲड. बी.एच.निरणे, प्रतिष्ठित व्यापारी इंदरचंद खियाणी, महेश मुखेडकर, अनिल गाडे यांचा लायन्स सचिव डॉ. महेश हिंगमिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक करताना दिलीप ठाकूर यांनी पुढील चाळीस दिवस दररोज मध्ये रात्री नांदेड शहरातील विविध भागात जाऊन थंडीत कुडकुडणाऱ्या बेघरांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकणार असल्याचे सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने जमा झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी हितगुज करताना प्रणिता चिखलीकर यांनी कोरोना काळात खा. चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप ठाकूर यांनी केलेल्या डब्याचे वाटप व श्री गुरुगोविंदसिंगजी शासकीय रुग्णालय लसीकरण केंद्रात साडेसहाशे दिवसापासून अखंडितपणे सुरू असलेल्या सेवा ही संघटन या उपक्रमाची प्रशंसा केली. लायन्स सेंट्रल अध्यक्ष शिवा शिंदे यांनी बोलताना २०२३ ब्लॅंकेटचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बाराशे ब्लॅंकेटची आवश्यकता असल्यामुळे दानशूर नागरिकांची चार हजार रुपये भरून वीस ब्लॅंकेट ची मदत करावी असे आवाहन केले.ॲड.निरणे, इंदरचंद खियाणी यांनी आपल्या भाषणातून अशा उपक्रमात सहकार्य केल्यामुळे आपल्या निधीचा योग्य विनीयोग झाल्याचे समाधान मिळते असे सांगितले.
प्रणिता चिखलीकर यांच्या हस्ते दीडशे गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.सूत्रसंचलन लायन्स अन्नपूर्णाचे अध्यक्ष अरुणकुमार काबरा यांनी तर आभार लायन्स अन्नपूर्णा कोषाध्यक्ष सविता काबरा यांनी मानले. ध्यानीमनी नसताना अचानक ब्लॅंकेट अंगावर टाकल्यामुळे झोपेतून जागे झालेले रुग्णांचे नातेवाईक चकित झाले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश उंद्रे, संतोष भारती, सोमेश उंद्रे, संजयकुमार गायकवाड, दिगंबर रूमणे, सचिन बेंद्रीकर, अविनाश कळकेकर यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचे नाव ब्लॅंकेटवर छापून त्यांच्याच हस्ते खऱ्याखुऱ्या गरजूंना वितरित करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले.